ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १२ - अमेरिकेतील अल्बामा येथे राहणा-या मुलाकडे गेलेल्या एका भारतीय वृद्धाला अमेरिकन पोलिसांनी अमानूष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सुरेशभाई पटेल असे या वृद्धाचे नाव असून या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याप्रकरणावर अमेरिकन दुतावासाकडून दाद मागितली आहे.
गुजरातमध्ये राहणारे सुरेशभाई पटेल (वय ५७ वर्ष) हे दोन आठवड्यांपूर्वी अल्बामा येथे राहणा-या मुलाकडे गेले आहेत. त्यांचा मुलगा चिराग पटेल हा नोकरीनिमित्त अल्बामा येथे असतो. गेल्या आठवड्यात सुरेशभाई पटेल हे घराबाहेरील रस्त्यावर फेरफटका मारत होते. या दरम्यान तिथे एक पोलिस अधिकारी आला व त्याने सुरेशभाईंची चौकशी केली. सुरेशभाई यांना फारसे इंगज्री येत नसले तरी त्यांनी इंग्रजी मुलाच्या घराचा क्रमांक सांगितला व तिथेच राहतो असे त्या अधिका-याला सांगितले. मात्र या उत्तरावर त्याचे समाधान झाले नाही व त्याने पटेल यांना जमिनीवर ढकलून दिले. यानंतर त्यांना मारहाणही केली. या मारहाणीत पटेल हे गंभीर जखमी झाले असून या मारहाणीमुळे त्यांना पॅरेलिसीसही झाले आहे. या मारहाणीविरोधात चिराग पटेल यांनी मेडीसन पोलिसांविरोधात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतेही कारण नसताना वृद्धाला मारहाण केल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. तर पटेल यांचे वकिल हॉंक शेरोड यांनी हे प्रकरण वंर्णभेदाशी संबंधीत असल्याचे सांगितले. सुरेसभाई पटेल यांना इंग्रजी येत नसल्याने परिस्थिती आणखी चिघळत गेली असेही शेरोड यांनी सांगितले. तर आम्हाला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन परिसरातील गॅरेजमध्ये संशयीत व्यक्ती फिरत असल्याचे सांगितले. यामुळेच पोलिस तिथे गेले होते असे प्रशासनाने स्पष्ट केले. या मारहाणीवरुन वाद निर्माण होत असल्याने पोलिसांनी संबंधीत अधिका-याला तडकाफडकी निलंबितही केले आहे.
अमेरिकेतील पोलिस यंत्रणेवर गेल्या काही महिन्यांपासून वर्णभेदाचे आरोप होत आहेत. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी निष्पाप कृष्णवर्णीय अमेरिकन तरुणाची हत्या केली होती. याविरोधात अमेरिकेतील अनेक भागांमध्ये निदर्शनेही झाली होती. यानंतर पोलिसांनी वर्णभेद सुरु ठेवणे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक समाजसेवी संस्थांनी दिली. याप्रकरणाचे पडसाद भारतातही उमटले असून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मेडीसन येथील वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधून माहिती मागवली आहे.