वॉशिग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले मित्र आहेत. पण सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका कृतीमुळे नरेंद्र मोदींच्या चाहत्यांना वाईट वाटू शकतं. अफगाणिस्तानसंदर्भातील चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींची नक्कल केल्याची माहिती समोर आली आहे. मोदींच्या हिंदी बोलण्याच्या शैलीचं डोनाल्ड ट्रम्प यांनी अनुकरण केलं. डोनाल्ड ट्रम्प यांना मोदींची नक्कल करताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 'वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकेतील इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, या वृत्ताबाबत व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही.
अफगाणिस्तानबाबत चर्चा करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींच्या एका विधानाचा उल्लेख केला. ‘कोणताही फायदा नसताना अमेरिकेने अफगाणिस्तानसाठी जे योगदान दिलं, ते अन्य कोणत्याही देशाने दिलेले नाही’ असं मोदींनी म्हटलं होतं. मोदींच्या या विधानाचा उल्लेख ट्रम्प यांनी चर्चेदरम्यान केला. विशेष म्हणजे हे विधान करताना ट्रम्प यांची शैली आणि आवाज हुबेहुब मोदींसारखा होता, असं या बैठकीला उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी व ट्रम्प या दोघांमध्ये फोनवरून चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांची प्रत्यक्ष भेटही झाली. नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी ट्रम्प यांनी मोदींचा उल्लेख ‘माझे खरे मित्र’ असा केला होता.