इस्रायल आणि हमास युद्धाची धग आता अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. गाझा पट्टीतील एकारुग्णालयावर मंगळवारी झालेल्या मिसाईल हल्ल्यात ५०० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हा हल्ला, हमास अथवा पॅलेस्टाईन इस्लामिक जिहादने केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. तर अरब देश या हल्ल्याचा आरोप इस्रायलवर करत आहेत. एवढेच नाही, तर या हल्ल्यानंतर अमेरिकेवरही लोक भडकले आहेत. लेबनानमध्ये तर हजारो निदर्शकांनी अमेरिकेच्या दुतावासालाच आग लावली. मात्र, सेन्याने अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत लोकांना मागे सरकवले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलमध्ये जाऊन इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे.
गाझा पट्टीवरील हॉस्पीटलवर सकाळी झालेल्या हल्ल्यामुळे "इस्रायलच्या स्वत:चा बचाव करण्याच्या अधिकारास" पाठिंबा मिळविण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील राजनैतिक प्रयत्नांना विस्कळीत केले आहे. अम्मान, जॉर्डन येथे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि इतर नेत्यांमधील शिखर बैठक रद्द करण्यात आली. तर, इस्रायलला पाठिंबा व्यक्त करत जो बायडेन आज एकता भेटीसाठी इस्रायलला पोहोचले. बायडेन यांनी पंतप्रधान बेंजामीन नेत्यानाहू यांची भेट घेतली. त्यावेळी, नेत्यानाहू यांनी पत्रकार परिषद घेऊन अमेरिकेचे आणि अमिरेकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले.
"इस्रायलच्या लोकांसाठी, इस्रायलच्या पाठीशी तुमच्यासारखा खरा मित्र असण्यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट नाही. तुम्ही आज इस्रायलमध्ये आणि इस्रायलच्या पाठिशी उभे आहात. तुमची आजची भेट म्हणजे युद्धाच्याप्रसंगी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची इस्रायलमध्ये झालेली भेट आहे. मला माहित आहे की मी जेव्हा म्हणतो तेव्हा मी इस्रायलच्या सर्व लोकांचे प्रतिनिधित्व करत बोलतो आहे - धन्यवाद श्रीमान अध्यक्ष, आज, उद्या आणि नेहमी इस्रायलच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद.", असे म्हणत बेंजामिन नेत्यानाहू यांनी बायडेन यांचे आभार मानले आहेत.
अमेरिकन नागरिकही उतरले रस्त्यावर
गाझा पट्टीवरील हल्ल्यानंतर लेबनानमधील अमेरिकन दूतावासाबाहेर हजारोंचा जमाव जमला होता. या जमावातील लोकांच्या हाती पॅलेस्टाईनचा झेंडा होता. हे लोक अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. याच वेळी जमावातील काही लोकांनी दूतावासाला आग लावली. एवढेच नाही, तर काहींनी अमेरिकेच्या दुतावासारून अमेरिकेचा झेंडा काढून त्या ठिकाणी पॅलेस्टाईनचा झेंडा लावण्याचाही प्रयत्न केला. याशिवाय, लेबननमध्ये सक्रिय असलेल्या हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने एक दिवसीय बंदची घोषणाही केली आहे.