वॉशिंग्टन - कोरियन द्विपकल्पात तणाव दिवसेंदिवस वाढत असून, मंगळवारी पुन्हा एकदा अमेरिकेच्या शक्तीशाली बॉम्बर विमानांनी कोरियाच्या आकाशात जोरदार युद्धसराव केला. उत्तर कोरियाकडून असलेला धोका लक्षात घेता त्यांना कशा प्रकारे उत्तर द्यायचे यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वरिष्ठ संरक्षण अधिका-यांसोबत चर्चा केली.
उत्तर कोरियाने मागच्या महिन्यात सहाव्यांदा अणूचाचणी केली तसेच जपानच्या दिशेने दोनदा क्षेपणास्त्र डागले त्यानंतर कोरियन द्विपकल्पातील तणावात अधिकच भर पडली. अमेरिकन हवाई दलाची दोन बी-1बी बॉम्बर आणि दक्षिण कोरियाच्या दोन एफ-15के फायटर विमानांनी संयुक्त युद्ध सराव केला. उत्तर कोरियाने अमेरिकेच्या गुआम तळाला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे.
अमेरिकेच्या दोन बॉम्बर विमानांनी दक्षिण कोरियाच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर पूर्व किनारपट्टीजवळच्या समुद्रात आकाशातून समुद्रात क्षेपणास्त्र डागण्याचा सराव केला. दक्षिण कोरियानंतर अमेरिकेच्या बॉम्बर विमानांनी जपानच्या लढाऊ विमानांसोबत सराव केला. अमेरिकेने प्रसिद्धपत्रकारव्दारे ही माहिती दिली.
मागच्या महिन्यातही अमेरिकेच्या फायटर विमानांनी दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानांसोबत सराव केला. यावेळी अमेरिकेची चार F-35B स्टेलथ फायटर जेट आणि दोन B-1B बॉम्बर विमाने सरावात सहभागी झाली होती. उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने घातलेले सर्व निर्बंध धुडकावून लावत अमेरिकेला धमकी दिली. अमेरिकेला लवकरच सर्वात मोठी वेदना सहन करावी लागेल असा इशारा उत्तर कोरियाच्या राजदूताने दिला होता.
उत्तर कोरियाने तीन सप्टेंबरला शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. त्यानंतर शुक्रवारी जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले. अमेरिकेने आपल्या ताफ्यातील अत्याधुनिक लढाऊ विमानाद्वारे उत्तर कोरियाला हवाई ताकद दाखवून दिली. उत्तर कोरियावर जरब बसवणे हा उड्डाणामागे हेतू होता. अमेरिकन आणि दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानांचे एकत्रित उड्डाण हा नियमित सरावाचा भाग होता. संयुक्त कारवाईची क्षमता वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या कवायती यापुढेही सुरु राहतील असे दक्षिण कोरियाने म्हटले होते.
दक्षिण कोरियाची चार F-15K फायटर जेट विमाने या सरावात सहभागी झाली होती. यापूर्वी 31 ऑगस्टला अशा प्रकारचा युद्ध सराव करण्यात आला होता. उत्तर कोरियानवे बेजबाबदारपणे जी शस्त्रास्त्रांची स्पर्धा चालवली आहे ती तात्काळ बंद करावी अन्यथा उत्तर कोरियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा वारंवार अमेरिकेकडून इशारा देण्यात येत आहे. तरीही उत्तर कोरियाच्या वर्तनात काहीही फरक पडलेला नाही.