ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ११ - अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये आघाडीवर असणा-या अमेरिकेने मानवरहीत विमानाप्रमाणे मानवरहीत युद्ध नौकेची निर्मिती केली आहे. जगातील अशा प्रकारची ही पहिलीच युद्धनौका आहे. अमेरिकेने सी हंटर असे या युद्धनौकेला नाव दिले आहे. शत्रू सैन्याच्या पाणबुडयांचा वेध घेण्याची सी हंटरवर मुख्य जबाबदारी असेल.
गुगलच्या स्वयंचलित कारप्रमाणे चालकदल आणि रिमोट कंट्रोल शिवाय सी हंटर समुद्रात कार्य करेल. सी हंटर १३२ फूट लांब ( ४० मीटर लांबी) आहे. दुस-या जहाजांबरोबर टक्कर टाळण्यासाठी सी हंटर अत्याधुनिक रडार आणि कॅमे-यांनी सज्ज आहे.
दोन डिझेल इंजिनच्या या युद्धनौकेचा वेग २७ कॉन्टस आहे. ही युद्धनौका म्हणजे रोबोटिक शस्त्रास्त्र निर्मितीतील पुढचे पाऊल आहे. पेंटागॉनच्या डीएआरपीएने ओरेगॉन गोदीमध्ये सी हंटरची बांधणी केली आहे. अशा प्रकारच्या युद्धनौकेमुळे नौदलाची जिवीतहानी टळणार आहे तसेच सैन्यावरील खर्चही कमी होणार आहे.
मानवरहीत ही युद्धनौका नेमून दिलेले कार्य व्यवस्थित करते की नाही, आंतरराष्ट्रीय समुद्र नियमांचे पालन होते की नाही यासाठी सी हंटरच्या दोन वर्ष वेगवेगळया चाचण्या होतील. त्यानंतर सी हंटरचा नौदलात समावेश होईल.
चीन आणि रशिया या दोन महासत्तांचा धोका लक्षात घेऊन अमेरिकेने या सी हंटरची निर्मिती केली आहे. तज्ञांनी अशा प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे मानवी जिवीताला असणा-या धोक्याकडेही लक्ष वेधले आहे. माणसाला शत्रू समजून रोबोटिक तंत्रज्ञानकडून हल्ला होऊ शकतो अशी भिती काहीजणांनी व्यक्त केली आहे.