बीजिंग: जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant) मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढत चालला असून, कोरोनाची उत्पत्ती मानल्या गेलेल्या चीनमध्येही याचा शिरकाव झाला आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे चीनमधील तीन शहरांमध्ये लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. तर चीनमध्ये ओमायक्रॉनच्या पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चीनमधील ओमायक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. ५५ लाख लोकसंख्या असलेल्या अनयांग शहरात लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. दोन वर्षांपूर्वी ११ जानेवारी २०२० रोजी चीनमध्ये पहिल्या कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याच दिवशी आता २०२२ मध्ये ओमायक्रॉनच्या पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात होत असलेल्यी बीजिंग ओलिम्पिकवर आता ओमायक्रॉन व्हेरिएंटचे संकट असल्याचे बोलले जात आहे.
अनयांग लॉकडाऊन लागणारे तिसरे शहर
ओमायक्रॉनचा तेजीचे वाढत असलेल्या फैलावामुळे चीनच्या शून्य कोरोना या धोरणाला धक्का लागल्याचे सांगितले जात आहे. अनयांग शहराआधी जियान आणि तियानजिन या शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, तीनही शहरात लावण्यात आलेला लॉकडाऊन नेमका किती दिवस चालेल, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. या तीनही शहरांतील लोकांना घरातून बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
दरम्यान, अमेरिकेतील नव्या कोरोना रुग्ण संख्येने विक्रम पातळी गाठली आहे. येथे सोमवारी ११ लाखांहून अधिक रुग्ण समोर आले. याचबरोबर, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्याही सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. यापूर्वी, ३ जानेवारीला अमेरिकेत १० लाख ३ हजारहून अधिक नवे रुग्ण समोर आले होते. वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनने अमेरिकेत कहर केला असल्याचे, या वाढत्या रुग्ण संख्येवरून दिसून येते. चिंताजन व्हेरिअंट मानल्या गेलेल्या Omicron ने अमेरिकेतील हॉस्पिटलायझेशनची संख्या सर्वोच्च पातळीवर नेली आहे.