लंडन : ब्रिटनमध्ये (Britain) कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या प्रकरणांमुळे येथील सरकारची झोप उडाली असेल, तरीही कठोर निर्णय घेण्यास सरकार तयार नाही. मंगळवारी याठिकाणी दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, काही दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने होणारी वाढ पाहता, सरकार लॉकडाऊनसारख्या कठोर उपाययोजना करू शकते, असे म्हटले जात होते, परंतु पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी लॉकडाऊनला नकार दर्शविला आहे. सध्या ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव सुद्धा वेगाने वाढत आहे. ज्याप्रकारे प्रकरणे वाढत आहेत, ते पाहता तज्ज्ञ कठोर नियम लागू करण्याचा सल्ला देत आहेत, मात्र सरकार सध्या यासाठी तयार नाही. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी सांगितले की, इंग्लंड आर्थिक घडामोडी बंद न करताही कोरोना संसर्ग अनियंत्रित होण्यापासून रोखू शकतो.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडमध्ये कडक लॉकडाऊन उपायांच्या अंमलबजावणीला विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, लसीचा बूस्टर डोस आणि लोकांना सावधगिरी बाळगण्यासाठी जागरूक करणे, हे कोरोनाची नवीन लाट रोखण्यासाठी पुरेसे आहे. दरम्यान, यूकेमध्ये मंगळवारी 218,724 नवीन कोरोना प्रकरणे नोंदवली गेली, जी एका दिवसात नोंदवलेल्या प्रकरणांपैकी सर्वाधिक संख्या आहे.
कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढलेले नाही, त्यामुळे सध्या सरकार लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांकडे पाहत नाही, असे ब्रिटनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी क्रिस व्हिट्टी म्हणाले. तर पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, आयसीयूमध्ये दाखल असलेल्या 60 टक्के रुग्णांनी कोरोनाची लस घेतलेली नाही. जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून संसर्ग पसरण्याची शक्यता मर्यादित करता येईल. दुसरीकडे, इटलीमध्ये एकाच दिवसात 170,844 कोरोना रुग्णांची पुष्टी झाली आहे.