जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहयला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याच दरम्यान आता कोरोना पाठोपाठ आणखी एका रहस्यमयी आजाराने थैमान घातल्याची घटना समोर आली आहे. या गूढ आजारात तब्बल 89 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दक्षिण सुदानच्या जोंगलेई राज्याच्या उत्तर भागातील शहर फांगकमध्ये अचानक अनेकांचा मृत्यू झाला आहे. या भयंकर परिस्थितीमुळे जागतिक आरोग्य संघटनेच्याही चिंतेत भर पडली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून आजारी पडलेल्या व्यक्तींचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. वैज्ञानिकांच्या एका रॅपिड रिस्पॉन्स टीमला या क्षेत्रात पाठवण्यात आलं आहे. हा धोका वेळीच ओळखून तपासणीसाठी एक टीम पाठवण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेनं घेतला आहे सुदानमध्ये एकूण 89 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे असं म्हटलं आहे. वैज्ञानिकांच्या गटाला एका हेलिकॉप्टरच्या माध्यमातून फांगकमध्ये प्रवेश करावा लागला. पुरामुळे भीषण परिस्थिती उद्भवली आहे.
जोंगलेईच्या सीमेलगतच्या प्रदेशात भयंकर पूरपरिस्थिती उद्भवल्याने या भागात मलेरियासारखे घातक आजार पसरले जात असल्याचं देशातील भूमी, निवास आणि सार्वजनिक उपयोगिता मंत्री लॅम तुंगवार कुइगवोंग यांनी म्हटलं आहे. तसेच देशात गेल्या 60 वर्षांत आलेल्या पुरातील हा अत्यंत भयंकर पूर असल्याचं म्हटलं जात आहे. या पुरामुळे जवळपास सात लाख नागरिकांना फटका बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.