जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. कोरोनाच्या संकटात आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे, आणखी एक आजार डोकं वर काढू पाहत आहे. नायजेरियामध्ये कोरोना महामारीच्या काळात झपाट्याने पसरत असलेला लासा फीव्हर आता जगासमोर नवीन आव्हान निर्माण करू शकतो. नायजेरिया सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) च्या म्हणण्यानुसार, नायजेरियामध्ये यावर्षी 88 दिवसांत लासा फीव्हरने 123 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 659 लोकांना संसर्ग झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, लासा फीव्हर हा एक्यूट व्हायरल हॅमोरेजिक फीव्हर आहे. लासा संबंध हा प्रामुख्याने एरिना व्हायरसशी आहे. आफ्रिकन मल्टीमॅमेट उंदीरांपासून मानवांना याची लागण होते. उंदरांची लघवी आणि घाणीने लागण झालेल्या घरगुती वस्तू किंवा खाद्यपदार्थांमुळे हा आजार पसरतो. नायजेरियात लासाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. 21 ते 30 वयोगटातील लोकांना सर्वाधिक संसर्ग झाला होता. यावर्षी 45 आरोग्य कर्मचारी या आजाराच्या विळख्यात आले आहेत.
अवयव निकामी होणे हे मृत्यूचे कारण
36 पैकी 23 राज्यांमध्ये संसर्गाची पुष्टी झाली आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान मृत्यू दर 18.7 टक्के आहे. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, लासा फीव्हरने संक्रमित 80 टक्के लोकांमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. संसर्ग झालेल्या पाचपैकी एकाला तीव्र वेदना होतात. शरीरातील प्रमुख अवयव, यकृत आणि किडनी या विषाणूमुळे वाईटरित्या प्रभावित झाल्याचे पुरावे आढळून आले आहेत. गंभीर रुग्णांमध्ये अवयव निकामी होणे हे मृत्यूचे कारण आहे. लासा फीव्हरचा माणसांवर प्रभाव दोन ते 21 दिवस असतो.
कोरोना पाठोपाठ जगासमोर नवं आव्हान ठरू शकतो आजार
यूएस हेल्थ एजन्सी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, नायजेरियातील लासा शहरात 1969 मध्ये पहिल्यांदा या आजाराची पुष्टी झाली. यानंतर त्याचे नाव लासा ठेवण्यात आले. दरवर्षी सरासरी एक लाख ते तीन लाख केसेस होतात आणि पाच हजार मृत्यू होतात. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, लासाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला खूप ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, छातीत दुखणे, अतिसार, खोकला, पोटदुखी आणि मळमळ असा त्रास होतो. गंभीर रुग्णांमध्ये चेहऱ्यावर सूज येणे, फुफ्फुसात पाणी होणे, तोंड व नाकातून रक्त येणे असे प्रकार दिसून येतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.