नवी दिल्ली - विश्वचषक स्पर्धेतील सर्वात हीट समजला जाणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला मात देत एकतर्फी विजय मिळवला. भारताच्या विजयाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, भारताचा हा पाकिस्तानवर दुसरा स्ट्राईक होता असं म्हणत ट्विट करुन भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या होत्या. अमित शाहांचे 'ते' ट्विट पाकिस्तानला चांगलेच झोंबले आहे. शाहांच्या या ट्विटला पाकिस्तान लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी उत्तर दिले आहे. भारत - पाकिस्तान क्रिकेट सामनाच्या दोन्ही देशांमधील युद्धजन्य परिस्थितीची तुलना करु नका असा ट्विट गफूर यांनी केले आहे.
भारताने विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवला. त्यांनतर भारतीय संघाचे देशभरातून अभिनंदन करण्यात आले. त्यात राजकीय नेत्यांनी सुद्धा भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. अमित शाह यांनी ट्विट करत भारतीय संघाला हटके शुभेच्छा दिल्या होत्या. भारताने पाकिस्तानवर केलेला हा दुसरा स्ट्राईक होता, जो की टीम इंडियाने केला होता आणि याचा निकालही तोच लागला. उत्कृष्ट खेळाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन, या विजयाबद्दल प्रत्येक भारतीयास अभिमान वाटत आहे व प्रत्येकजण आनंदोत्सव साजरा करत आहे. असे ट्विट शाह यांनी भारताच्या विजयानंतर केले होते.
पाकिस्तानच्या गफूर यांनी ट्विटवरुन शाह यांच्या ट्विटला उत्तर देताना म्हणाले. "प्रिय अमित शाह , तुमचा संघ चांगला खेळला आणि जिंकला सुद्धा. मात्र दोन वेगळ्या स्तरावरील गोष्टींची तुलाना होऊ शकत नाही. त्यामुळे स्ट्राइक आणि या सामन्याची तुलना केली जाऊ शकत नाही.” याचवेळी गफूर यांनी, भारताच्या एअरस्ट्राइकनंतर केलेल्या प्रतिहल्ल्याचा उल्लेख सुद्धा आपल्या ट्विटमध्ये केला. २७ फेब्रुवारी रोजी हवाई हद्द ओलांडून केलेल्या हल्ल्याला आम्ही नवशेरामध्ये दिलेल्या उत्तरात भारताची दोन जेट विमाने आम्ही पाडली होती. त्यामुळे तुम्ही केवळ आश्चर्य करत बसा, असं गफूर म्हणाले.
अमित शाह यांनी केलेला ट्विट पाकिस्तानला चांगलाच झोंबले असल्याचा दिसत आहे. त्यामुळेच याला उत्तर देण्यसाठी थेट लष्कराचे मेजर जनरल गफूर स्वतः मैदानात उतरले आहे . तर, दुसरीकडे पाकिस्तानी चाहत्यांनी पराभवानंतर संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानमध्ये नाराज चाहत्यांनी टीव्ही फोडल्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.