वॉशिंग्टन - अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे सोमवारी (18 डिसेंबर) झालेल्या एका रेल्वे दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नव्याने सुरु झालेल्या आमट्रेक मार्गावर सोमवारी पहिली प्रवासी ट्रेन धावली. सिएटलवरुन पोर्टलंडच्या दिशेने ही हायस्पीड ट्रेन जात होती.
यादरम्यान वॉशिंग्टनमधील तकोमा येथे स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ट्रेन रुळावरुन घसरली. जिथे हा अपघात झाला तिथे वळण होते आणि तिथून काही अंतरावर पूल होते. या पुलाच्या खालून महामार्ग जातो. रेल्वेचा पहिला डबा रुळावरुन थेट महामार्गावर पडला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी रेल्वेमध्ये जवळपास 78 प्रवासी व 5 कर्मचारी होते. दरम्यान, दुर्घटनेत जखमी झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
वॉशिंग्टनमधील सिएटलपासून जवळपास 64 किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान, अपघातामागील नेमकं कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला.