दक्षिण तुर्कीत ७.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार भूकंपाचे सर्वाधिक धक्के दक्षिण तुर्कीच्या गाजियानटेप येथे बसले आहेत. भूकंपाच्या धक्क्यांनी संपूर्ण शहर हादरलं असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भूकंपाच्या धक्क्यांनी अनेक इमारती कोसळल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. अद्याप या व्हिडिओंची पुष्टी होऊ शकलेली नाही.
व्हायरल व्हिडिओ पाहता मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. मोठमोठ्या इमारतील जमीनदोस्त झाल्या आहेत. तुर्कीमध्ये रेस्क्यु ऑपरेशन सुरू असून अनेक संस्थांच्या माध्यमातून मदतकार्य केलं जात आहे. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय इस्रायल, पॅलेस्टाईन, सायप्रस, लेबनॉन, इराकमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यापूर्वी तुर्की-इराण सीमेवर भूकंप झाला होता. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.९ एवढी होती. सोशल मीडियावर ज्या प्रकारचे व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत ते अस्वस्थ करणारे आहेत. लोक इकडे तिकडे धावत आहेत. जमिनीवर मोठमोठ्या इमारतींचे ढिगारे दिसत आहेत.