लंडन - यॉर्क सिटीमध्ये किंग चार्ल्स आणि क्विन कंसोर्ट, केमिला यांच्यावर अंडी फेकल्याप्रकरणी पोलिसांनी पॅट्रिक थेलवेल या २३ वर्षीय आरोपीला अटक केली होती. सार्वजनिक व्यवस्थेस बाधा आणल्याचा आणि शांतता भंग केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. आता त्याला या प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी पॅट्रिक याला अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे जिची कल्पनाही कुणी करणार नाही.
यूकेमधील द मिरर या संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या बातमीनुसार किंग चार्ल्स आणि त्यांची पत्नी केमिला यांच्यावर अंडी फेकल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या व्यक्तीवर सार्वजनिकरीत्या अंडी नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच पुढच्या काळात किंग चार्ल्स यांच्यापासून ५०० मीटर दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
किंग चार्ल्स हे नॉर्थ इंग्लंडमधील यॉर्क सिटीच्या मिकलेगेट बार लँडमार्कवर लोकांच्या भेटीगाठी घेत होते त्यावेळी आरोपीने त्यांच्यावर अंडी फेकली होती. आता पोलिसांनी आरोपीला जामिनावर मुक्त केले आहे.
दरम्यान, कोर्टात सुनावणीवेळी जमावाने उत्तेजित केल्याने आपण असं कृत्य केलं, असं आरोपीने सांगितलं. या चुकीनंतर आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्याही मिळत आहेत, असा दावाही त्याने केला. दरम्यान, पॅट्रिक याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला जामिनावर सोडले. सुटल्यानंतर पॅट्रिक म्हणाला की, जमावाने माझ्यावर हल्ला केला होता. त्यांनी मला खलनायक ठरवले. त्या दिवशी कुणी माझे केस ओढत होता तर तर कुणी थपडा मारण्याचा प्रयत्न करत होता. एकजण तर माझ्यावर थुंकला. माझ्या वकिलाने मला वाचवले. आता सोशल मीडियावरूनही मला धमक्या येत आहेत.