अमेरिकेमधील हवाई राज्यातील जंगलामध्ये लागलेल्या भीषण आगीने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. या अग्नितांडवाच्या ज्वाळांमध्ये सापडल्याने संपूर्ण शहर जळून खाक झाले आहे. माऊई बेटावरील लहानिया शहरात लागलेल्या आगीमध्ये प्राण गमावणाऱ्यांची संख्या वाढून ६७ झाली आहे. तर एक हजारपेक्षआ अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. १ हजारपेक्षा अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत.
शोध पथकांकडून धुमसत असलेल्या जंगलात शोधमोहीम सुरू आहे. कुणी आगीत अडकलेलं नही ना, याचा शोध घेतला जात आहे. त्याबरोबरच या ऐतिहासिक शहरामध्ये आग एवढ्या वेगाने कशी काय पसरली, याचा शोध अधिकाऱ्यांकडून घेतला जात आहे. हवाई बेटांवर लागलेल्या आगीमध्ये भारतातून १५० वर्षांपूर्वी पाठवलेला जुना वटवृक्षही आपल्या अस्तिवाची लढाई लढत आहे. हा वणवा येथील इतिहासातील सर्वात घातक आपत्ती बनला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्निफर डॉगच्या मदतीने प्राण गमाणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. मृतांचा जो आकडा सांगण्यात आला, ती संख्या वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यांनी सांगितले की, आगीमुळे आतापर्यंत एक हजार घरं जळून खाक झाली आहेत. तर हजारो लोक बेघर झाले आहेत. आता या शहराच्या पूनर्बांधणीसाठी अनेक वर्षे आणि अब्जावधी डॉलरची आवश्यकता आहे.
दरम्यान, या वणव्यामुळे १५० वर्षापूर्वी भारतातून पाठवण्यात आलेला एक वटवृक्षही संकटात सापडला आहे. हा वटवृक्ष १८७३ मध्ये माउईमधील लहानिया शहरामध्ये लावण्यात आला होता. आता तो चांगलाच विस्तारला असून, अमेरिकेतील सर्वात मोठा वटवृक्षांमध्ये त्याची गणना होते.