‘चार पायांवरून’ दोन पायांवर चालण्याचा माणसाचा प्रवास अतिशय मोठा आहे. याच प्रवासात जगातील सर्वांत तीक्ष्ण मेंदूचा प्राणी ही बिरुदावली मिळवण्यातही माणसाची हजारो वर्षं गेली. उत्क्रांतीच्या काळातून मोठी मजल दरमजल करत आपण क्रांती केली. पण समजा, आपण पुन्हा उलट्या गतीनं प्रवास करत ‘रिव्हर्स इव्हॉल्यूशन’नं मागे मागे जात परत अप्रगत झालो, चार पायांवर चालायला लागलो, गुहेत राहायला, कच्चं मांस खायला लगलो तर?.. असं होऊ शकतं?..
तुर्कीत घडलेल्या एका घटनेमुळे शास्त्रज्ञांना आणि संपूर्ण जगालाच एका मोठ्या कोड्यात टाकलं आहे. तुर्कीच्या दक्षिण भागात राहणाऱ्या एका कुटुंबात अतिशय आश्चर्यजनक अशी घटना घडली आहे. रेसिट आणि हॅटिस उलास या दाम्पत्याला एकूण १९ मुलं होती, पण त्यातली चार मुलं आणि एक मुलगी दोन पायांवर चालू शकत नव्हते. आजही ते चक्क ‘चार पायांवर’ चालतात! ते माणसांसारखे बोलतात, विचार करतात, त्यांच्या इतर सगळ्या कृती माणसांसारख्या आहेत, पण चालतात मात्र चार पायांच्या प्राण्यांप्रमाणे!
पूर्ण प्रगत झालेला माणूस चार पायांवरून दोन पायांवर चालायला लागला, तेव्हापासून एकाही कुटुंबात आजवर कधीच ‘उलटी प्रगती’ दिसली नाही. म्हणजे कोणत्याच कुटुंबातला एकही सदस्य पुन्हा चार पायांवर चालताना आढळला नाही. मग हे कसं काय झालं? या कुटुंबातली माणसं आजही चार पायांवर का चालतात? - या घटनेनं संशोधकही हादरले आहेत. आजचा प्रगत माणूस परत पाषाणयुगात आणि त्याही आधीच्या परिस्थितीत गेला तर काय, तो तसा पुन्हा जाऊ शकतो का, या प्रश्नांच्या उत्तरासाठी संशोधक आता सरसावले आहेत.
अर्थात ही घटना आजची नाही. याच कुटुंबातल्या सदस्यांवर २००६मध्ये एक डॉक्युमेंटरीही प्रकाशित झाली होती. त्यात या परिवारातील चार पायांवर चालणाऱ्या सदस्यांची लाइफस्टाइल दाखवली गेली होती. त्यावेळीही मोठी खळबळ उडाली होती. ‘द फॅमिली दॅट वॉक्स ऑन ऑल फोर’ असं या डॉक्युमेंटरीचं नाव होतं. लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्सचे प्रोफेसर हम्फ्रे यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त करताना म्हटलं आहे, मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, की आधुनिक माणूस पुन्हा कधी जनावरांच्या, प्राण्यांच्या स्थितीत जाईल आणि चार पायांवर चालायला लागेल! या कुटुंबातील सदस्यांना कुठल्या त्रासांना सामोरं जावं लागत असेल, याची आपल्याला कल्पनाही करता येणार नाही.
यासंदर्भाच्या एका अहवालात म्हटलं आहे, या परिवारातील सदस्यांचं बाकी वागणं माणसासारखं वाटत असलं तरी मानसिक पातळीवरही ते दिव्यांग आहेत. अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो. आपल्या शरीराचा तोल ते व्यवस्थित सांभाळू शकत नाहीत. प्रो. हम्फ्रे यांच्या म्हणण्यानुसार मानवी उत्क्रांतीच्या संक्रमणकालीन टप्प्याची झलक या सदस्यांमुळे मिळते. त्यांची चतुष्पाद चाल चिंपांझींसारखी असली तरी, ती सरळ चालण्याआधीची मध्यस्थ अवस्था दर्शवते.
चार पायांवर चालत असल्यामुळे उलास परिवाराला आणि त्यातील सदस्यांना खूप काळ जगापासून दूर राहावं लागलं. जेव्हा जेव्हा हे सदस्य लोकांसमोर आले तेव्हा तेव्हा त्यांना लोकांच्या टोमण्यांनाही कायम सामोरं जावं लागलं. त्यामुळे बाह्य जगापासून ते लांबच राहिले. २००५पर्यंत तर त्यांच्याबाबत कोणाला माहीतही नव्हतं. या परिवाराला एक अतिशय दुर्लभ असा आजार असल्याचंही मानलं जातं. त्यामुळेच त्यांना दोन पायांवर चालता येत नाही आणि चालताना हातांचाही आधार घ्यावा लागतो.
तुर्कीच्या एका प्राध्यापकाचा अप्रकाशित शोधनिबंध एका ब्रिटिश संशोधकाच्या हाती लागल्यानंतर त्याचा त्यावर विश्वासच बसेना. या परिवारातील सदस्यांना ‘यूनर टॅन सिंड्रोम’ हा दुर्धर आजार झाला असल्याचा दावा या शोधनिबंधात करण्यात आला होता. हा आजार झालेल्या लोकांना चालताना पायांबरोबर हातांचाही आधार घ्यावा लागतो, असं त्यात म्हटलं आहे. उलास कुटुंबातील या सदस्यांच्या चार पायांवर चालण्याच्या कृतीमुळे मानवी उत्क्रांतीच्या सिद्धांतालाच आव्हान दिलं गेल्याचं मानलं जात आहे. यासंदर्भात अजूनही संशोधन सुरू आहे.
समाजानं झिडकारल्यानं राहिले अलिप्त! लोकांपासून, समाजापासून कायम दूर राहावं लागल्यामुळे उलास कुटुंबातील या सदस्यांना शाळेतही जाता आलं नाही. लोकांबरोबरच्या त्यांच्या आठवणी अतिशय दु:खद आहेत. कोणीच त्यांना जवळ न केल्यामुळे समाजापासून ते अलिप्तच राहिले. चार पायांवर चालणाऱ्या या बहीण-भावांचं वय आता २५ ते ४१ वर्षे इतके आहे. समाजात न मिसळल्यामुळे, शाळेत न गेल्याने इतर कोणतीच भाषा त्यांना येत नसली, तरी कुर्दिश भाषा त्यांना समजते, त्या बळावर त्यांचं धकून जातं!