इस्राइलमध्ये एका अँटी टँक क्षेपणास्त्र हल्ल्यामद्ये एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहे. हे तिघेही भारतातीलकेरळ राज्यात राहणारे होते. हा हल्ला लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने हा हल्ला केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
उत्तर इस्राइलच्या सीमेवर सोमवारी एका शेतामध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकाचं नाव पॅट निबीम मॅक्सवेल असून, तो ३१ वर्षांचा होता. केरळमधील रहिवासी असलेला मॅक्सवेल दोन महिन्यांपूर्वी इस्राइलमध्ये गेला होता. तिथे तो शेतामध्ये मोलमजुरी करत होता. हा हल्ला उत्तर इस्राइलच्या सीमेवर गॅलीलल परिसरातील एका शेतामध्ये सोमवारी ११ वाजण्याच्या सुमारास झाला.
मॅक्सवेलच्या कुटुंबामध्ये त्याची पत्नी आणि पाच वर्षांची मुलगी आहे. त्याची पत्नी सात महिन्यांची गर्भवती आहे. तर या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या अन्य दोन भारतीयांची ओळख बुश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेल्विन अशी पटवण्यात आली आहे.
इस्राइलमध्ये मिसाईल हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या मॅक्सवेलचे वडील पॅखरॉस मॅक्सवेल यांनी सांगितले की, माझ्या सुनेने फोन करून मला माझ्या मुलाला झालेल्या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर माझ्या मुलाच्या मृत्यूची माहिती समोर आली. मला तीन मुलगे आहेत., त्यामधील दोन इस्राइलमध्ये काम करत होते. तर एक अबूधाबी मध्ये काम करतो. मृत पॅट याला एक पाच वर्षांची मुलगी आहे. तर त्याची पत्नी सात महिन्यांची गर्भवती आहे.
दरम्यान, इस्राइलच्या भारतातील दूतावासाने इस्राइलमध्ये झालेल्या भारतीय नागरिकाच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच या हल्ल्यामधील जखमींना शक्यतोपरी मदत आणि उपचार केले जात आहेत, असे इस्राइलच्या दूतावासाने सांगितले आहे.