गाझामध्ये घुसून हमासच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत असलेल्या इस्राइली सैनिकांना आणखी एका आघाडीवर लढाई लढावी लागत आहे. इस्राइलच्या डॉक्टरांनी सांगितले की, गाझाच्या मोहिमेवर असलेल्या अनेक इस्राइली सैनिक पोटाच्या एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत. त्याला ते ‘शिगेला’ असं म्हणतात. अस्वच्छता आणि युद्धक्षेत्रातील असुरक्षित भोजनामुळे हा आजार पसरत आहे.
इस्राइलच्या असुता अशदोद विद्यापीठ रुग्णालयाचे संसर्गजन्य आजार विभागाचे संचालक डॉ. ताल ब्रॉश यांनी या आजाराबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, इस्राइल सुरक्षा दलांच्या डॉक्टरांनी गाझाच्या मोहिमेत असलेल्या सैनिकांमध्ये पोटाशी संबंधित हा गंभीर आजार पसरत असल्याचा अहवाल दिला आहे.
डॉ. ब्रोच यांनी सांगितले की, हा आजार पसरण्यामागचं एक स्पष्ट कारण आहे ते म्हणजे इस्राइली नागरिकांकडून शिजवून गाझामध्ये तैनात असलेल्या सैनिकांना पाठवलं जाणारं भोजन होय. हे भोजन शिगेला आणि हानिकारक जीवाणूंमुळे दूषित होते. वाहतुकीदरम्यान हे भोजन थंडही केलं जात नाही. त्यामुळे यातील जीवाणू कायम राहतात. तसेच जेव्हा त्या भोजनाचं सेवन केलं जातं, तेव्हा सैनिक आजारी पडतात.
डॉ. ब्रोच यांनी सांगितले की, एकदा जेव्हा सैनिकांना जुलाब होतात, तेव्हा हा जीवाणू वेगाने पसरतो. त्यामुळे इतर सैनिकही आजारी पडतात. या आजारापासून वाचण्याचा एकमेव उपाय म्हणजे भोजन हे नेहमी डबाबंद करून पाठवलं पाहिजे. तसेच ते भोजन प्रोटीनयुक्त आणि सुकामेवा हे असतील, तर अधिक उत्तम राहील.
शिगेला जीवाणू हा जीवाणूंचा एक प्रकार आहे. जेव्हा तो शरीरात प्रवेश करतो, तेव्हा तो आजाराचं कारण ठरतो. त्याच्या लक्षणांमध्ये ताप, दीर्घकाळ जुलाब होत राहणे यासारखी लक्षणं दिसतात. ज्यांची प्रकृती खराब असते, तसेच एचआयव्ही किंवा इतर आजारांमुळे ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत झालेली असते, असे रुग्ण या आजारामुळे दीर्घकाळ पीडिर राहू शकतात. तसेच वेळेवर उपचार झाले नाहीत, तर रुग्णाचा जीवही जाऊ शकतो.
डॉक्टर ब्रोच सांगतात की, जेव्हा एकदा जीवाणू रक्तप्रवाहामध्ये प्रवेश करतो तेव्हा प्राण जाण्याचा धोका अधिकच वाढतो. विशेषकरून कुपोषित मुले, एचआयव्ही, मधुमेह आणि कर्करोगाने पीडित असलेले रुग्ण हे या आजाराचा संसर्ग झाल्यास अधिकच असुरक्षित होतात. शिगेला हा संसर्ग झालेल्या विष्ठेच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्काच्या माध्यमातून सहजपणे पसरू शकतो. त्यामुळे अशा रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवून उपचार केले जातात.