काठमांडू - भारतात कारवाया करणारा पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेचा एजंट लाल मोहम्मद उर्फ मोहम्मद दर्जी याची नेपाळची राजधानी काठमांडू येथे हत्या करण्यात आली आहे. काठमांडूमध्ये मोहम्मद दर्जी याला पळवून पळवून ठार मारण्यात आले. मोहम्मद दर्जी हा कारने घरी आला असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर बेछुट गोळीबार केला. लाल मोहम्मदला वाचवण्यासाठी त्याच्या मुलीने छतावरून उडी मारली. मात्र तोपर्यंत मोहम्मदचा मृत्यू झाला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
लाल मोहम्मद हा आयएसआयच्या इशाऱ्यावर पाकिस्तान आणि बांगलादेशमधून बनावट भारतीय चलन मागवून ते नेपाळमधून भारतात पाठवत असे. लाल मोहम्मद दर्जी हा भारतात बनावट नोटांचा पुरवठा करणारा मोठा सप्लायर होता. तो आयएसआयचा एजंट होता. एवढंच नाही तर तो डी गँगच्याही संपर्कात होता. तो बनावट नोटांच्या धंद्याशिवाय तो आयएसआयला त्यांच्या कारवायांसाठी लॉजेस्टिक सप्लायही करायचा. तसेच तो आयएसआय एजंट्सना आश्रय देण्याचे कामही करायचा.
लाल मोहम्मद काठमांडूमधील कोठाटार परिसरात राहायचा. १९ सप्टेंबर रोजी तो कारने घरी आला. तो कारमधून उतरून घरी जात होता. तेवढ्यात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. मोहम्मद गाडीच्या आडोशाने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र हल्लेखोरांनी तो पळत असताना त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यादरम्यान, एक महिला छडावरून उडी मारत हल्लेखोरांच्या दिशेने जाताना दिसते. मात्र तोपर्यंत हल्लेखोरांनी आपले काम पूर्ण करत मोहम्मदची हत्या केली होती.