संयुक्त राष्ट्र : इस्रायल आणि हमास यांच्यात मागील २४ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे गाझापट्टीतील लाखो पॅलेस्टिनी नागरिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शस्त्रसंधी करत युद्ध थांबविण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्राचे गाझातील प्रतिनिधी फिलीप लजारिनी यांनी केले. युद्धाच्या माध्यमातून इस्रायल पॅलेस्टिनी नागरिकांना सामूहिक मृत्युदंडाची शिक्षा देत आहे, तसेच निष्पाप नागरिकांवर जबरदस्तीने विस्थापित होण्याची वेळ आणल्याचेही लजारिनी यांनी म्हटले.
इस्रायलने युद्धाच्या पार्श्वभूमीवर गाझापट्टीची नाकाबंदी केल्याने तेथील नागरिक अन्न-पाण्यापासून वंचित राहत आहेत. भुकेने व्याकूळ पॅलेस्टिनी नागरिकांनी नुकतेच संयुक्त राष्ट्राच्या गुदामाची लूट केली. या घटनेवर बोलताना लजारिनी यांनी इस्रायलला युद्धविराम करण्याचे आवाहन केले. युद्ध असेच सुरू राहिल्यास संयुक्त राष्ट्राला गाझामध्ये मदतकार्य करणे अवघड होईल, अशी चिंता व्यक्त केली. इस्रायलने गाझाच्या अंतर्गत भागात घुसून हल्ले सुरू केले. रुग्णालयांनाही सोडले जात नसल्याने गाझात कोणतेही ठिकाण सुरक्षित राहिलेले नाही. अन्न, पाणी, औषधी, इंधन तसेच मूलभूत सुविधांपासून स्थानिक नागरिक वंचित राहत आहे.
क्षमतेपेक्षा चौपट निर्वासित
गाझातील ६,७२,००० लोकांनी आपली घरे सोडून संयुक्त राष्ट्रातर्फे चाललेल्या शाळा-निवारागृहांमध्ये किंवा हजारो जखमी रुग्णांसह रुग्णालयांमध्ये त्यांनी आश्रय घेतला आहे. अनेक निवारागृहांमध्ये क्षमतेच्या चारपट नागरिक वास्तव्याला आले आहेत.
२०१९ नंतर सर्वाधिक मृत्यू
- संयुक्त राष्ट्राने इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध हे आतापर्यंतचे सर्वांत गंभीर असल्याचे म्हटले आहे. गाझात आतापर्यंत ८,३०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यात ६६ टक्के अधिक महिला व मुलांचा समावेश आहे.
- युनिसेफचे कार्यकारी संचालक कॅथरिन रसेल यांनी गाझात ३,४०० मुलांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. २०१९ नंतरची ही सर्वांत मोठी मुलांची मृत्युसंख्या असल्याचे म्हटले आहे.
हमासच्या हल्ल्याचाही निषेध
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत बहुतांश नेत्यांनी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची तीव्र शब्दांत टीका केली. तसेच हमासने इस्रायलच्या २३० ओलिसांची तातडीने सुटका करण्याची विनंती करण्यात आली. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करत रुग्णालये, शाळा तसेच निवासी क्षेत्रात हल्ले न करण्याचा सल्ला दिला.
ओलिस ठेवलेल्या एका सैनिकाची सुटका
इस्रायली लष्कराने सोमवारी गाझामध्ये खोलवर मुसंडी मारली. प्रदेशाच्या मुख्य शहरावर रणगाडे आणि इतर चिलखती वाहनांसह हल्ले करत त्यांनी हमासच्या अतिरेक्यांनी बंदी केलेल्या महिला सैनिक प्रा. ओरी मेगिडिश हिची सुटका केली. सुटकेनंतर ती तिच्या कुटुंबाला भेटली. पंतप्रधान नेतन्याहू यांनी तिच्या घरी जाऊन स्वागत केले.
इस्रायल-हमास युद्ध सीरियात
वाढती अस्थिरता, हिंसाचार आणि १२ वर्षांच्या संघर्षावर राजकीय तोडगा काढण्याच्या दिशेने खुंटलेली प्रगती यामुळे इस्त्रायल-हमास युद्ध सीरियामध्ये पसरत आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत गेयर पेडरसन यांनी सुरक्षा परिषदेत सांगितले.
युद्धविराम स्वीकारणे म्हणजे शरण जाणे...
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी बंदिवानांच्या सुटकेसाठी किंवा युद्ध संपवण्यासाठी युद्ध थांबविण्याचे आवाहन फेटाळले. युद्धविरामाची हाक स्वीकारणे म्हणजे हमासला शरण जाण्यासारखे आहे. हमास शरणागती पत्करत नाही, तोपर्यंत युद्ध थांबणार नाही, असे ते म्हणाले.