वॉशिंग्टन : अमेरिकेतील अलास्का येथे सुमारे ४० हजार फूट उंचीवर उडणारी व एखाद्या लहान कारच्या आकाराची असलेली अज्ञात वस्तू त्या देशाच्या हवाई दलाच्या विमानाने पाडली. तसा आदेश राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला होता. चीनचे हेरगिरी करणारे बलून पाडल्यानंतर काही दिवसांतच अमेरिकेने पुन्हा ही कारवाई केली. मात्र ही उडणारी वस्तू नेमकी काय होती, याचा तपशील उघड केलेला नाही. आकाशात उडणारी ही अज्ञात वस्तू अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना गुरुवारी नजरेस पडली. हवाई दलाच्या एफ-२२ या लढाऊ विमानाने उडती वस्तू पाडली. (वृत्तसंस्था)
चीनच्या कंपन्या, एक संशोधन संस्था काळ्या यादीतहेरगिरी करणाऱ्या बलून प्रकरणी कडक पवित्रा धारण करत अमेरिकेने चीनच्या पाच कंपन्या व एका संशोधन संस्थेला काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे त्यांना अमेरिकी तंत्रज्ञान उपलब्ध होणार नाही. चीनच्या अंतराळविषयक कार्यक्रमाशी या कंपन्या व संस्था निगडित आहेत. काही शहरांत बलूनचे प्रकरण उजेडात आल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ॲन्टोनी ब्लिंकन यांनी चीनचा दौरा तत्काळ रद्द केला होता.