ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 18 - ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर शेन वॉर्नला एका रिऍलिटी शोदरम्यान अॅनाकोंडा चावल्याची घटना घडली आहे. शेन वॉर्न सध्या सुरक्षित असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत, मात्र त्याला कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये यासाठी डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.
शेन वॉर्न सध्या 'आय एम सेलिब्रेटी...गेट मी आऊट ऑफ हिअर' या रिअॅलिटी शोमध्ये काम करत आहे. याच शोमधील टास्क करत असताना ही घटना घडली. टास्कप्रमाणे शेन वॉर्नला अगोदर उंदीर, बेडूक, खेकडे, झुरळ असलेल्या बॉक्समध्ये डोकं घालून स्टार्स शोधायचे होते. हा टास्क संपल्यानंतर त्याला सापांच्या बॉक्समध्ये डोकं घालण्यास जेव्हा सांगितल तेव्हा अॅनाकोंडाने त्याच्या डोक्याचा चावा घेतला.
'हा साप विषारी नसला तरी त्याच्या दातांमुळे तो चावल्यावर प्रचंड वेदना होतात. याच कार्यक्रमात शेन वॉर्नने सापांबद्दल आपल्याला वाटणारी भीती बोलून दाखवली होती. तरीही त्याने हा टास्क करण्याचं ठरवलं होतं' अशी माहिती चॅनेल टेनच्या प्रवक्यांनी दिली आहे.