तेरहान - इराण आणि इराकच्या सीमेवर आलेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या वेगवेगळ्या व्हिडीओमधून या भूकंपाची तीव्रता जगासमोर आली आहे. या भूकंपा दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये न्यूज चॅनेलवर लाइव्ह कार्यक्रम सुरू असताना भूकंप आल्याचे चित्रित झाले आहे. तसेच भूकंपामुळे चॅनलच्या अँकरची उडालेली घाबरगुंडीही दिसत आहे. साधारण सव्वा मिनिटाच्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला अँकर बोलताना दिसत आहे. मात्र भूकंपामुळे टेबल हलू लागल्यामुळे अँकरचा गोंधळ उडाला. त्यानंतर भूकंपाचे धक्के अधिकच तीव्र झाल्याने हा अँकर घाबरल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
इराण-इराकच्या सीमा भागात भूकंपाचा मोठा धक्का बसला. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ११.४८ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.२ नोंदविण्यात आली, तर केंद्रबिंदू १९ कि.मी. खोल भूगर्भात होता. केंद्रस्थानापासून हलबजा ४१ कि.मी. सुलेमानिया ८९ कि.मी. तर बगदाद २१२ कि.मी.वर आहेत. या भूकंपामध्ये दोनशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत.