ऑनलाइन लोकमत
पेशावर, दि. २३ - पाकिस्तानच्या पेशावर शहरातील एक प्राचीन हिंदू मंदिर दुरुस्तीच्या नावाखाली गुप्तपणे पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जुन्या पेशावरमधील करीमपूरा भागात हे मंदिर होते. मॉल बांधण्यासाठी दुरुस्तीच्या नावाखाली गपचूप हे मंदिर पाडण्यात आल्याचे या भागातील स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
दहा दिवसांपूर्वी हे मंदिर पाडण्याचे काम सुरु झाले आणि कोणत्याही आठकाडीशिवाय हे काम अजूनही सुरु आहे. हेरिटेज वास्तू पाडणे हा गुन्हा आहे. या जागेवर व्यावसायिक इमारत उभारायची असल्याने हे पाडकाम सुरु आहे असे इथल्या स्थानिकांनी सांगितले.
या मंदिराच्या पाडकामा विरोधात इथल्या स्थानिक रहिवाशांमध्ये असंतोष खदखदत आहे. मंदिर पाडून व्यावसायिक इमारत उभी करायला इथल्या स्थानिकांचा विरोध आहे. बिगर मुस्लिम मालमत्तांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या ईटीपीबी आणि पुरातत्व विभागाने पाडकाम करणा-यांवर कोणतीही कारवाई केली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.