जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रि केत एका गुहेमध्ये प्राचीन मानवी अवशेष सापडले आहेत. मानवी चेहऱ्याशी किंचित मिळतेजुळते हे अवशेष असून, यावर दावे- प्रतिदावे केले जात आहेत. संशोधकांनी या प्राण्याला सध्या ‘नाह- लेह- डी’ असे नाव दिले आहे.जोहान्सबर्गपासून तीस मैल अंतरावर एका गुहेत संशोधकांना हाडाचे सापळे आणि दातांचे अवशेष सापडले आहेत. विचित्र आणि आश्चर्यकारक अशा शब्दांत याचे वर्णन करण्यात आले आहे. १५ संशोधकांना मानवी हाडांचे व इतर अवयवांचे १,५५० नमुने सापडले आहेत. जोहान्सबर्गच्या विश्वविद्यालयाचे प्रोफेसर आणि या संशोधन पथकातील प्रमुख ली बर्गर याबाबत बोलताना म्हणाले की, हाडांच्या सापळ्यावरून असे दिसते की, याचे वय लाखो वर्षांपूर्वीचे आहे. मात्र, याचे निश्चित अनुमान करणे सध्या कठीण आहे. यावर आणखी संशोधन सुरू आहे. संशोधकांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत या प्राचीन अवशेषांबाबत अधिकृत घोषणा केली, तर शोधपत्रिका ई-लाईफमध्येही नव्या संशोधनावर भाष्य करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनच्या इतिहास विभागाचे संचालक रिक पॉटस म्हणाले की, या अवशेषांच्या वयाबाबत जोपर्यंत अंदाज बांधता येत नाही, तोपर्यंत मानवी उत्क्रांतीच्या दृष्टीने याचे महत्त्व अधोरेखित करता येणार नाही. तथापि, गुहेच्या दुर्गम भागात हा प्राणी कसा गेला यावरही तर्कवितर्क केले जात आहेत. कदाचित, मृत्यूूनंतर या प्राण्याचे अवशेष येथे ठेवले गेले असावेत असाही अंदाज आहे. (वृत्तसंस्था)
दक्षिण आफ्रिकेतील दुर्गम गुहेत सापडले प्राचीन मानवी अवशेष
By admin | Published: September 11, 2015 3:49 AM