ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. ७ - भारतीय मच्छिमारांनी सागरी सीमा रेषा ओलांडून श्रीलंकेत प्रऴेश केल्यास त्यांना गोळ्या घालू असा इशारा श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी दिला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १० मार्चपासून श्रीलंका दौ-यावर जात असतानाच श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. विक्रमसिंघे यांच्या विधानावर भारत सरकार काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी एका तामिळ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय मच्छिमारांविषयी संतापजनक विधान केले. श्रीलंकेचे नौदल नियमानुसारच भारतीय मच्छिमारांवर कारवाई करतात, भारतीय मच्छिमार श्रीलंकेच्या सागरी हद्दीत प्रवेश करतात व त्यामुळेच त्यांच्यावर बळाचा वापर करावा लागतो असे विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे. श्रीलंकेच्या नौदलाच्या कारवाईची पाठराखण करण्यासाठी विक्रमसिंघे यांनी उदाहरणही दिले. 'जर एखादा व्यक्ती माझे घऱ तोडत असेल तर मी त्या व्यक्तीला शूट करु शकतो. कायद्यानेच मला हे अधिकार दिले आहेत, हीच बाब नौदलासाठी लागू होते असे विक्रमसिंघे स्पष्ट करतात. 'ही आमची सागरी हद्द आहे, जाफनातील मच्छिमारांनाच या भागात मासेमारीसाठी परवानगी मिळायला हवी. जाफनातील मच्छिमारांसोबत श्रीलंका सरकार चर्चा करत असून लवकरच तोडगा निघेल. पण या भागात भारतीय मच्छिमार कशाला येतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.