Sirisha Bandla Space Travel: अमेरिकी अंतराळ कंपनी व्हर्जिन गॅलेक्टिकचे (Virgin Galactic) रिचर्ड ब्रेनसन (Richard Branson) आपल्या सहा सहकाऱ्यांसोबत लवकरच अंतराळ मोहिमेवर जाणार आहेत. या सहा जणांमध्ये एक भारतीय वंशाच्या महिला शास्त्रज्ञाचाही समावेश आहे. सिरिशा बांदला असं तिचं नाव असून संपूर्ण भारतीयांचं लक्ष या उड्डाणाकडे असणार आहे. येत्या ११ जुलै रोजी न्यू मॅक्सिको येथून उड्डाण होणार आहे. सिरिशा अंतराळात संशोधन विभागाची जबाबदारी सांभाळणार आहे. अंतराळ मोहिमेवर जाणाऱ्या सहा जणांच्या पथकात दोन महिलांचा समावेश आहे. सिरिशासोबत आणखी एक बेश मोसिस या महिला शास्त्रज्ञाचा समावेश आहे.
३४ वर्षीय सिरिशा या अॅरोनॉटिकल इंजिनिअर आहेत. इंडियानाच्या पर्ड्यू विश्वविद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. कल्पना चावला यांच्यानंतर अंतराळात झेप घेणाऱ्या त्या दुसऱ्या भारतात जन्मलेल्या महिला ठरणार आहेत. दरम्यान आतापर्यंत चार भारतीय अंतराळात गेले आहेत. "मला युनिटी २२ क्रू आणि कंपनीचा एक भाग होणार असल्याची गोष्ट माझ्यासाठी अतिशय अभिमानास्पद आहे.", असं ट्विट सिरिशा यांनी केलं आहे.
आंध्रप्रदेशात जन्मसिरिशा बांदला यांचा जन्म भारतात आंध्रप्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात एका गावात झाला होता. तर टेक्सासच्या ह्यूस्टनं येथे त्यांचं शालेय शिक्षण झालं आहे. त्यांचे आजोबा बांदला रगहिया एक कृषी वैज्ञानिक आहेत आणि त्यांनी आपल्या नातीच्या कामगिरीचंही तोंडभरुन कौतुक केलं आहे.
"मी नेहमी तिच्यातील उत्साह लहानपणापासूनच पाहत आलो आहे. अखेर ती तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ती या मिशनमध्ये यशस्वी होईल आणि संपूर्ण देशाला याचा अभिमान वाटेल", असं सिरिशा यांचे आजोबा म्हणाले. सिरिशा यांचे वडील मुरलीधर देखील वैज्ञानिक असून ते अमेरिकन सरकारमध्ये सीनिअर एग्जीक्युटिव्ह पदावर कार्यरत आहेत.