बर्लिन, दि.21- जर्मनीच्या चॅन्सेलरपदी चौथ्यांदा निवड होण्याच्या दिशेने अॅंजेला मर्केल यांची वाटचाल सुरु आहे. 2005 पासून मर्केल या पदावरती आहेत. मतदानापुर्वी घेतलेल्या चाचण्यांमधून मर्केल यांनाच अधिक पसंती मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. कोणत्याही प्रकारे आघाडीची स्थापना झाली तरी मर्केलच चॅन्सेलर होतील असे संकेत मिळाले आहेत.
ख्रिश्चियन डेमोक्रॅटिक युनियन म्हणजेच सीडीयूचा घटकपक्ष असणारा मर्केल यांचा कॉन्झर्वेटिव ब्लॉक आणि ख्रिश्चियन सोशल युनियन हा गट संसदेचे कनिष्ठ सभागृह ब्युंडनस्टागमध्ये सर्वात मोठा गट म्हणून उदायस येईल अशी शक्यता आहे.या दोन्ही पक्षांना एकत्रित 37 टक्के मते मिळण्याची शक्यता असून मर्केल यांचे प्रमुख विरोधक असणाऱ्या मार्टिन शुल्झ यांच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी (एसपीडी) ला 20 टक्के मते मिळतील असे ओपिनियन पोलवरुन दिसते. 24 सप्टेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. ओपिनियन पोलचा विचार करता गेल्या काही महिन्यांमध्ये शुल्झ मर्केल यांच्यापेक्षा फारच पिछाडीवर असल्याचे दिसून येते. तीन आठवड्यांपुर्वी या दोघांमध्ये टीव्हीवर दाखवण्यात आलेली एकमेव थेट चर्चा झाली, त्यामध्ये शुल्झ यांच्यापेक्षा मर्केल अधिक प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले होते.
दुर्गा मुर्तीची घरवापसी, भारतातून चोरलेली मुर्ती अँजेला मर्केल परत करणार
ओपिनियन पोलमध्ये केवळ 25 टक्के लोकांनी पुढील चॅन्सेलरपदी शुल्झ असावेत असे मत मांडले तर 50 टक्के लोकांनी आपले मत मर्केल यांच्या पारड्यात टाकले. याच पोलनुसार जर्मनीत स्थलांतर करणाऱ्यांविरोधात असणाऱ्या अतिउजवा पक्ष अल्टर्नेटिव्ह फॉर जर्मनीला ब्युंडनस्टागमध्ये पहिल्यांदाच प्रवेश मिळेल तर 2013 सालच्या निवडणुकीत 5 टक्के मते मिळवण्यात अपयशी झाल्याने संसदेत न येऊ शकणाऱ्या फ्री डेमोक्रॅटिक पार्टी या लिबरल पक्षालाही पुन्हा संसदेत येण्याची संधी मिळेल. अल्टर्नेटिव्ह फॉर जर्मनी पक्षाला 12 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे तर फ्री डेमोक्रॅटिक पार्टीला 10 टक्के मते मिळतील असे या ओपिनियन पोलमधून दिसते.
अॅंजेला मर्केल यांचा जन्म 17 जुलै 1954 साली हॅम्बर्ग येथे झाला. लिपझिश विद्यापिठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या 1989 पासून राजकारणामध्ये विविध पदांवरती आहेत. गेली 12 वर्षे त्या जर्मनीच्या चॅन्सेलर असून त्यांनी स्वतःच्या विशेष वेगळ्या धोरमांमुळे युरोपात आपला स्वतःचा ठसा निर्माण केला आहे.