Canada Prime Minister Justin Trudeau: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध तणावग्रस्त आहेत. कॅनडाने केलेले दावे फेटाळून लावत भारताने आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा सूर मवाळ झाल्याचे दिसत आहे. यातच आता कॅनडातील सामान्य नागरिकाने थेट पंतप्रधान यांच्याशी भररस्त्यात वाद घालत, तुमच्यामुळे देशाचे वाट्टोळे झाले असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका कार्यक्रमानिमित्त ट्रुडो टोरंटोमध्ये गेले होते. तिथून बाहेर पडताना नागरिकांना अभिवादन करत जात होते. यावेळी त्यांनी एका चिमुकल्या मुलीशी संवाद साधला. पुढे जाताना, मी तुमच्याशी हस्तांदोलन करणार नाही, तुम्ही देशाचे वाट्टोळं केले, असे तोंडावर ऐकवले. हे ऐकून पंतप्रधानांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांबरोबरच खुद्द जस्टिन ट्रुडो हेही आश्चर्यचकित झाले. यानंतर त्या नागरिकाशी संवाद साधला.
मी या देशाची कशी वाट लावली?
जस्टिन ट्रुडोंनी त्या व्यक्तीला, मी या देशाची कशी वाट लावली? असा प्रश्न विचारला. त्यावर, इथे कुणी साधे घर विकत घेऊ शकते का? तुम्ही लोकांवर कार्बन टॅक्स लावला. पण तुमच्याच ताफ्यात ९ व्हीएट कार्स आहेत, असे म्हणत ट्रुडोंच्या ताफ्यातील वाहनांवर आक्षेप घेतला. यानंतर ट्रुडोंनी त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहितीये का की तुम्ही दिलेल्या कार्बन टॅक्सच्या पैशांचे आम्ही काय करतो? आम्ही प्रदूषणावर कर आकारतो आणि ते पैसे तुमच्यासारख्या कुटुंबांकडेच परत पाठवतो, या उत्तराने त्या व्यक्तीचे समाधान झाले नाही. हा सगळा पैसा युक्रेनला पाठवताय, असा आरोप त्या व्यक्तीने केला. यावर, तुम्ही व्लादिमिर पुतीन यांचे खूप ऐकता वाटते. तुमच्याकडे रशियाबद्दल खूप चुकीची माहिती आहे, असे म्हणत ट्रुडो तिथून निघून गेले.