सध्या पाकिस्तानच्या मीडियामध्ये भारतातील एका महिलेच्या नावाची चर्चा आहे. ते नाव म्हणजे अंजू. कुटुंबीयांशी खोटं बोलून अंजू तिच्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेली. अंजू विवाहित असून तिला दोन मुलं आहेत. तिने इस्लाम धर्म स्वीकारला असून आता फातिमा असं नवीन नाव असल्याचा दावा पाकिस्तानी मीडिया करत आहे. तसेच ती ज्या फेसबुक फ्रेंडला भेटायला आली होती त्याच्याशी निकाह केला आहे. अंजूच्या येण्याने नसरुल्लाह आणि त्यांच्या कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले.
अंजू आणि नसरुल्लाह हे सध्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अपर दीर भागात आहेत, इस्लामाबादहून पोहोचण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, अंजू इथे का आली आणि तिच्या लग्नाच्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, याविषयी नसरुल्लाहशी बोललं असता, तो खूप संतापलेला आणि नाराज दिसत होता. काय करावे हेच कळत नसल्याचं त्याने सांगितलं. नसरुल्लाहने माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.
रिपोर्टनुसार, अपर दीरचे जिल्हा पोलीस अधिकारी मोहम्मद मुश्ताक म्हणाले, 'अंजू नसरुल्लाहसोबत असून तिला सुरक्षा देण्यात आली आहे. अंजूला २१ ऑगस्टपूर्वी पाकिस्तान सोडावे लागेल, असे नसरुल्लाहला सांगण्यात आले आहे. अंजू जाईल त्यावेळी नसरुल्लाहला याची माहिती पोलिसांना द्यावी लागणार आहे. रिपोर्टनुसार, अंजू आणि नसरुल्लाहची गोष्ट समोर आल्यानंतर मीडिया आणि लोकांच्या परिसरातील लोकही हैराण झाले आहेत.
अंजूच्या येण्याने नसरुल्लाहच्या सामान्य जनजीवनावरही परिणाम झाला आहे. पण काही व्यावसायिक अंजूकडे पाहुणे म्हणून पाहत आहेत आणि महागड्या भेटवस्तू देऊन तिचे स्वागत करत आहेत. अलीकडेच पाकिस्तानातील दोन रिअल इस्टेट व्यावसायिकांनी अंजूला दोन प्लॉट भेट दिले आहेत. अंजू आणि नसरुल्लाह लवकरच एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करू शकते, अशा बातम्या पाकिस्तानी माध्यमांमध्ये येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.