Anju in Pakistan: भारतीय महिला व राजस्थानची रहिवासी असलेली अंजू पती आणि मुलांना सोडून यावर्षी पाकिस्तानात गेली होती. तिथे गेल्यानंतर तिने पाकिस्तानच्या नसरुल्लाला भेटायला आल्याचे सांगितले. नसरुल्लाला ती फेसबुकवर भेटली आणि प्रेमात पडल्याचे अंजूने मान्य केले. त्यानंतर तिने पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण आता मात्र अंजू काही महिने पाकिस्तानात राहून भारतात परणार असल्याचे बोलले जात आहे.
अंजू भारतात परतणार... का आणि कधी?
अंजू ऑक्टोबरच्या अखेरीस भारतात परतणार असल्याचे सांगितले जात आहे. अंजूशी झालेल्या संवादाच्या आधारे ती भारतात येणार असल्याचा दावा केला जात आहे. आपल्या मुलांसाठी ती भारतात परतत असल्याचे अंजूने म्हटलं आहे. लोकांचे अनेक प्रश्न आहेत आणि भारतात परतल्यानंतर ती सर्व प्रश्नांची उत्तरे देईल, असे तिने सांगितले. अंजूने सांगितले की तिची पाकिस्तानमधील व्हिसाची मर्यादा संपुष्टात येत आहे आणि ती व्हिसाची कालमर्यादा वाढवू इच्छित नाही. तिची मुलं हे त्यामागचे कारण आहे. तिला भारतात परतायचे आहे आणि मुलांसोबत राहायचे आहे. ती फक्त मुलांसाठी येत आहे, असे तिने सांगितले आहे.अंजू म्हणते की तिने कधीही कोणापासून काहीही लपवलेले नाही. पाकिस्तानात पोहोचल्यावर सगळ्यात आधी मी माझ्या बहिणीला फोन केला. आई-वडिलांशीही बोललो. माझ्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. ती म्हणाली की ती देशाच्या सुरक्षा एजन्सी आणि पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. अंजू म्हणाली की तिचा हेतू चुकीचा नव्हता. पाकिस्तानात आल्यावर ती पूर्णपणे कायदेशीररित्या आली. अंजू भारतात आल्यानंतर काही मोठे खुलासेदेखील करणार आहे.
काय आहे अंजूची कहाणी?
मूळची उत्तर प्रदेशची असलेल्या अंजूचे 2007 मध्ये राजस्थानमध्ये लग्न झाले. ३४ वर्षीय अंजूला दोन मुले आहेत. यावर्षी अंजू सोशल मीडियावर खैबर पख्तुनख्वा प्रांतातील नसरुल्लाच्या प्रेमात पडली आणि व्हिसावर पाकिस्तानात पोहोचली. अंजूने परदेशात नोकरीच्या नावाखाली दोन वर्षांपूर्वी पासपोर्ट बनवला होता आणि त्यानंतर या वर्षी ती शांतपणे पाकिस्तानचा व्हिसा मिळवून निघून गेली. अंजू पाकिस्तानात गेल्यानंतर दोन्ही देशांच्या मीडियामध्ये ती प्रसिद्ध झाली. पाकिस्तानातील अनेक बडे व्यापारीही तिला भेटायला आले असल्याचे सांगितले गेले होते.