नवी दिल्ली : नेपाळने चीनशी जवळीक साधल्यानंतर आता मालदीवनेही चीनशी संधान साधत तेथील भारतीय सैनिक आणि हेलिकॉप्टर माघारी बोलावण्यास सांगितले आहे. जुनमध्ये मालदीवसोबतचा करार संपुष्टात आला असून मालदीव सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढील काळात मालदीववरून भारत आणि चीनमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
मालदीवमध्ये काही दशकांपासून भारताने आपले सैन्य ठेवलेले आहे. मालदीवमध्ये भारताचे खच्चीकरण करण्यासाठी चीन या देशात मोठ्या प्रमाणावर रस्ते, मोठमोठे पूल आणि विमानतळ बांधत आहे. काही दिवसांपूर्वीच मालदीवच्या यामीन सरकारने राजकीय विरोधकांविरोधात मोहिमा चालिवल्या होत्या. याला भारताने कडाडून विरोध केला होता. त्यावेळी विरोधकांनी भारताकडे सैन्याने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.
मालदीवमध्ये राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांचे सरकार आहे. मात्र, ते चीनचे समर्थक आहेत. या कारणांनी मालदीवमध्ये भारताविरोधात वातावरण निर्माण करण्यात आले. याचा परिणाम भारताकडून हिंदी महासागरातील छोट्या देशांना होत असलेल्या संरक्षण विषयक मोहिमांवर झाला आहे. भारत या देशांना आर्थिक क्षेत्र विकसित करून देणार आहे. तसेच आतापर्यंत सामुद्री चाचांपासून संरक्षण देत आला आहे.
मालदीवचे भारतातील राजदूत अहमद मोहम्मद यानी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, भारताने मालदीवला दिलेली दोन हेलिकॉप्टर आता वापरात नाहीत. या हेलिकॉप्टरच्या मदतीने जी कामे केली जात होती ती करण्यास मालदीव आता सक्षम झाला आहे. पहिल्यांदा या हेलिकॉप्टरचा वापर केला जात होता, मात्र अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी आम्ही स्वत:ची क्षमता विकसित केली आहे.
भारत विकसित करत असलेल्या आर्थिक क्षेत्राचे काम दोन्ही देशांकडून केले जात आहे. हे क्षेत्र भारतापासून 400 किमी आणि जगातील सर्वात व्यस्त जलवाहतूक मार्गापासून खूपच जवळ आहे. मालदीवमध्ये भारताचे हेलिकॉप्टर आणि 50 जवान तैनात आहेत. यामध्ये वैमानिक आणि देखभाल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांच्या व्हिसाची मुदत संपलेली आहे. तरीही भारताने त्यांना माघारी बोलावलेले नाही.