लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ व इतर तिघांविरुद्ध पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी संस्थेने भ्रष्टाचाराचा आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. ३४ वर्षांपूर्वी पंजाब प्रांतातील भूखंडाचे अवैध वाटप केल्याच्या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाकचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले ७० वर्षीय शरीफ यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात आले आहे. सध्या ते उपचारासाठी लंडनमध्ये गेलेले आहेत. २०१७ मध्ये पनामा पेपर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पंतप्रधानपदावरून हटवले होते. तेव्हापासून विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत.
पंतप्रधानपदावरून हटवल्यानंतर शरीफ यांनी तपास यंत्रणेच्या ना कोणत्या समन्सला ना कोणत्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यांना गुन्हेगार घोषित करण्यासाठी यंत्रणेने न्यायालयाचे दारही ठोठावले आहे.भ्रष्टाचाराच्या नवीन प्रकरणात शरीफ यांच्याबरोबरच जंग/जिओ माध्यम समूहाचे मालक मीर शकीलूर रहमान, लाहोर विकास प्राधिकरणचे (एलडीए) माजी संचालक हुमायूं फैज रसूल व माजी संचालक (भूमी) मियां बशीर यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. यापैकी रहमान यांना १२ मार्च रोजी अटक करण्यात आली असून, तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. नवाज शरीफ व इतर दोन जणांनी कालव्याला लागून असलेला मौल्यवान भूखंड रहमान यांना देऊ केला, असा आरोप आहे.शरीफ हे भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात न्यायालयात हजर न झाल्यामुळे इस्लामाबादेतील एका न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध २९ मे रोजी अटक वॉरंट जारी केले आहे. त्यात केलेल्या आरोपानुसार, त्यांना विदेशी व्यक्तींकडून आलिशान वाहने व भेटवस्तू मिळत होत्या. वास्तविक वाहने व भेटवस्तू या सरकारी मालमत्ता आहेत. असे असताना त्या वस्तू राज्यांचे प्रमुख किंवा अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आल्या. त्या वस्तूंचा जाहीर लिलाव होईपर्यंत त्या सरकारी मालमत्तेचा भाग असतात, असा पाकिस्तानमध्ये कायदा आहे.शरीफ उपचारासाठी लंडनमध्येनवाज शरीफ यांना लाहोर उच्च न्यायालयाने विदेशात जाण्याची परवानगी दिल्यानंतर ते मागील वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये लंडनमध्ये उपचारासाठी गेलेले आहेत. चार आठवड्यांत डॉक्टरांनी त्यांची तब्येत ठीक असल्याचे सांगितल्यानंतर तातडीने पाकमध्ये परतण्याचे शपथपत्रही त्यांनी दिले होते. ते अद्याप परतलेले नाहीत. ‘आजारी’ असलेले शरीफ लंडनच्या एका कॅफेमध्ये आपल्या कुटुंबासमवेत चहा पिताना दिसले होते व त्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर झळकले होते. त्यावरून त्यांच्या तब्येतीबाबत वादविवाद सुरू झाला होता. शरीफ यांना अल-अजिजिया मिल्स भ्रष्टाचार प्रकरणात जामीन मिळालेला आहे. तत्पूर्वी, ते कोट लखपत जेलमध्ये सात वर्षांच्या जेलची शिक्षा भोगत होते.