इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करुन जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकण्याची घटना ताजी असतानाच आणखी एका हिंदू मुलीचं अपहरण झालं आहे. या हिंदू मुलीचे अपहरण करुन धर्म परिवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील वरिष्ठ पत्रकार बिलाल फारुकी यांनी ट्विट करुन या नवीन प्रकरणाची माहिती समोर आणली आहे.
बिलाल फारुकी यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे की, आणखी एक हिंदू मुलीचं सिंध प्रांतातून अपहरण करण्यात आलेलं आहे. ही घटना तेव्हा घडली आहे जेव्हा पाकिस्तानात दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करण्याचा घटना सर्व माध्यमांमध्ये चर्चेत आहे. इमरान खान सरकार अल्पसंख्यांकांना सुरक्षा देण्यास अपयशी ठरलंय का ? असा सवाल बिलाल फारुकी यांनी विचारला आहे. सध्या पाकिस्तानात हिंदू मुलींचे अपहरण करुन त्यांना जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी दबाव आणला जातोय. पंतप्रधान इमरान खान यांनी या घटनांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत मात्र या घटनेवरुन पाकिस्तान सरकारवर अनेक माध्यमातून टीका करण्यात येत आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही पाकिस्तानमधील हिंदू मुलींच्या अपहरण प्रकरणात उडी घेतली आहे. ज्या दोन हिंदू मुलींचे अपहरण करण्यात आलेलं आहे त्यांना सोडवण्यासाठी भारताने पाकिस्तानवर दबाव आणला आहे. या मुलींना लवकरात लवकर सोडवून त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करा अशी मागणी सुषमा स्वराज यांनी केली आहे.
सुषमा स्वराज यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे की, या मुलींच्या वयाला घेऊन कोणताही वाद नाही, नवीन पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान देखील विश्वास ठेवणार नाहीत की या वयात स्वखुशीने मुली धर्म परिवर्तन करतील तसेच लग्नाचा निर्णय घेऊ शकतील.
दरम्यान इस्लामाबाद हायकोर्टानेही इमरान सरकारला हिंदू मुलीच्या अपहरणावरुन फटकारले आहे. या दोन मुलींना सुरक्षा देण्याचे आदेश हायकोर्टाने इमरान सरकारला दिले आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणात 7 आरोपींना अटक केल्याची माहिती इमरान यांनी कोर्टात दिली.