कॅनडात गेल्या काही दिवसापासून खलिस्तानी अतिरेक्यांकडून हिंदू मंदिरांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. काही खलिस्तानी समर्थकांनी शनिवारी मध्यरात्री सरे येथील एका मंदिराची तोडफोड केली. तसेच भारतीय समुदायामध्ये भीती निर्माण करण्यासाठी मंदिराच्या मुख्य दरवाजावर खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूबाब पोस्टर्स चिकटवले. आरोपीचे हे कृत्य मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्येही कैद झाले आहेत. यामध्ये दोघजण मंदिरात आल्याचे दिसत आहेत.
चीनवर नजर! भारत अरुणाचल प्रदेशात १२ जलविद्युत प्रकल्प उभारणार, 'वॉटर वॉर'ला चोख प्रत्युत्तर
दोघांनीही आपले चेहरे लपवले आहेत. निळा पगडी घातलेला माणूस मंदिराच्या मुख्य दरवाजावर खलिस्तानी सार्वमताचे पोस्टर लावतो आणि त्यानंतर दोघेही तिथून पळून जात असल्याचे दिसत आहे.
खलिस्तानी हरदीपसिंग निज्जर, याचे पोस्टर मंदिराबाहेर लावण्यात आले होते, त्याची यावर्षी १८ जून रोजी कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले होते. नुकतीच भारत सरकारने ४१ दहशतवाद्यांची यादी जाहीर केली, त्यात हरदीप निज्जरचे नाव होते. हरदीप निज्जरवर कॅनडातील सरे येथे गोळी झाडण्यात आली, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तो कॅनडाच्या शीख संघटनेशी संबंधित होता.
तो पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील रहिवासी होता. २०२२ च्या सुरुवातीला, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पंजाबमधील जालंधर येथे एका हिंदू पुजाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याबद्दल फरारी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरवर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. NIA च्या माहितीनुसार, पुजाऱ्याच्या हत्येचा कट खलिस्तान टायगर फोर्सने रचला होता.
यापूर्वीही कॅनडात मंदिरांवर हल्ले झाले आहेत कॅनडातील हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मंदिरांवर हिंदू आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याची अशीच प्रकरणे यापूर्वीही अनेकदा समोर आली आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये ओंटारियो प्रांतातील BAPS श्री स्वामीनारायण मंदिराची मंगळवारी रात्री तोडफोड करण्यात आली होती आणि त्यावर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. त्यानंतर मंदिराच्या प्रतिनिधींनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.