काही दिवसांपूर्वी याच सदरात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सिक्रेट प्रेयसीचा वृत्तांत प्रसिद्ध झाला, अनेकांसाठी तो नवीन होता; पण पुतिन हेच इतके रहस्यमय आणि ‘रंगीन’ आहेत की, त्यांच्याबाबतच्या अनेक ‘बातम्या’ अजूनही गुपित आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तर ते कोणालाच या कानाची खबर त्या कानाला लागू देत नाहीत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणी नाक खुपसलेलंही त्यांना चालत नाही. कोणी जर असं करायचा प्रयत्न केला, ती व्यक्ती नंतर देशातून परागंदा होते आणि कोणालाही दिसत नाही, अशी त्यांची ख्याती आहे. पुतिन यांच्या वैयक्तिक आयुष्याशी जास्त जवळीक दाखवणारे अनेकजण आज रशियातून हद्दपार आहेत. या प्रकारामुळे नुकताच एका पत्रकारालाही देशाबाहेरचा रस्ता दाखवला गेला. पुतिन यांच्या सिक्रेट गर्लफ्रेंड किती आहेत, कोण आहेत, याबद्दल फारशी माहिती अजूनही कोणालाच नाही; पण ज्या पत्रकाराला आत्ता देशातून बाहेर घालवण्यात आलं, त्यानं अगोदरच फोडलेल्या माहितीनुसार पुतिन यांची आणखीही एक ‘अधिकृत’ सिक्रेट गर्लफ्रेंड आहे आणि तिच्यापासून झालेली एक ‘सिक्रेट डॉटर’ही आहे. या दोघी जणी जगापासून अज्ञात असल्या, पुतिन यांनी कधीच त्याची जाहीर वाच्यता केली नसली आणि त्या दोघी मायलेंकीनीही याबाबत अजून तरी तोंड गप्पच ठेवलेलं असलं तरी पुतिन कृपेनं आज त्या गडगंज संपत्तीच्या मालकिणी आहेत. नव्यानं उघडकीस आलेल्या पुतिन यांच्या या ‘जुन्याच’ गर्लफ्रेंडचं नाव आहे स्वेतलाना क्रिवोनोगिख. त्या टिनेजर असताना नव्वदच्या दशकात त्यांच्यात प्रेमाचे बंध गुंफले गेले. स्वेतलाना या आधी सफाई कर्मचारी होत्या, असं म्हटलं जातं; पण आज रशियातील सर्वाधिक श्रीमंत महिलांमध्ये त्यांची गणना होते. स्वेतलाना यांचं नाव खऱ्या अर्थानं जगभर प्रसिद्धीस आलं, ते २०२१ मध्ये. परदेशात असलेली त्यांची संपत्ती पाहून अनेकांचे डोळे फिरले, तेव्हा. कारण त्यावेळी अत्यंत गाजलेल्या ‘पँडोरा पेपर्स’मध्ये त्यांचं नाव होतं.
पुतिन यांना स्वेतलाना यांच्यापासून झालेली ‘सिक्रेट’ मुलगी म्हणजे एलिझावेटा क्रिवोनोगिख; पण लुइझा रोझोवा या नावानंच ती प्रसिद्ध आहे. ही दोन्ही नावं म्हणजे एकच व्यक्ती असून, ती पुतिन यांची मुलगी असल्याचं रशियन माध्यमांनीही कधी उघडपणे तर कधी आडून-आडून जगाला सांगितलं आहे. पुतिन यांची १९ वर्षांची ही टिनेजर मुलगी सोशल मीडिया, त्यातही इन्स्टाग्रामवर बरीच फेमस आहे. आपला पती कोण आहे आणि आपले वडील कोण आहेत, हे या दोघींनी आजपर्यंत कधीच जगाला सांगितलं नाही. सेंट पीटर्सबर्ग येथील एका आलिशान पेंटहाऊसमध्ये दोन्हीही मायलेकी राहतात. त्याचं हे घर ‘क्लब हाऊस’ या नावानं प्रसिद्ध आहे. या पेंटहाऊसची किंमत १.७ दशलक्ष पाऊंड आहे. अर्थातच हे क्लब हाऊस म्हणजे हिमनगाचं फक्त एक टोक आहे. या दोघीजणी सातशे कोटी पाऊंड संपत्तीच्या धनी आहेत, असं म्हटलं जातं. त्यांच्या या ‘सिक्रेट मायलेकींच्या’ ‘सिक्रेट’ घराचा पत्ताही अचानकपणे माध्यमांच्या हाती लागला. फूड कुरिअर ‘टेक अवे’तर्फे या दोघींनी काही खाद्यपदार्थांची ऑर्डर दिली होती. त्यांचा डेटाबेस हॅक केल्यावर ही माहिती उघड झाली. एका माध्यमाने ही बातमी फोडल्यावर लगोलग त्यांचं प्रसारण रोखण्यात आलं आणि त्यांना ‘ब्लॉक’ करण्यात आलं.
लुइझाचे इन्स्टाग्रामवर ८० हजार फॉलोअर्स होते. त्यावर ती सतत काहीना काही पोस्ट करीत असायची; पण गेल्या पाच महिन्यांपासून तिनं आपल्या अकाऊंटवर काहीही पोस्ट केलेलं नाही. ते अकाऊंटच तिनं बंद करून टाकलं आहे. पुतिन यांनी तंबी दिल्यामुळेच सोशल मीडियावरूनही ती गायब झाल्याचं म्हटलं जातं. तिच्या नावानं इन्स्टाग्राम प्रोफाइल सर्च केलं तर त्यावर रशियन भाषेत ‘युजर नॉट फाऊंड’ एवढाच मेसेज येतो. लुइझा बिझिनेस जेट विमानानं रशिया ते मोनॅको आणि पॅरीस असा प्रवास सतत करीत असते. तिची स्वत:ची फॅशन एजन्सी आहे, ती ॲक्रोबॅट डान्सर आणि प्रसिद्ध डीजेही आहे. गेल्या वर्षी आपल्या १८ व्या वाढदिवशी लुइझानं मॉस्कोमधील एक नाइट क्लबमध्ये जोरदार पार्टी केली होती. जोमदार डान्स केला होता. सरकारी बीएमडब्ल्यू कारनं कडेकोट सुरक्षेत ती आली आणि तशीच गेलीही. पुतिन यांची मुलगी या पार्टीला येणार आहे, याची कोणालाही कानोकान खबर नव्हती. ज्या बीएमडब्ल्यू कारनं ती आली, ती एका रशियन मंत्र्याची होती.
लुइझा पुतिन यांचीच मुलगी? ब्रॅडफोर्ड युनिव्हर्सिटीचे व्हिज्युअल कॉम्प्युटर एक्सपर्ट हसन उगेल यांनी पुतिन आणि लुइझा यांच्या फोटोंचा अभ्यास करून लुइझाचा फोटो पुतिन यांच्या फोटोशी ७५ टक्के जुळतो, असं जाहीर केलं होतं; पण लुइझानं पुतिन आपले वडील असल्याचा इन्कार केला होता. पुतिन यांची माजी पत्नी लुडिवला ओकेरेतनाया यांच्यापासून त्यांना दोन मुली आहेत. मारिया आणि कतरिना. त्यातील मोठ्या मारियाचा नुकताच घटस्फोट झाला आहे. युक्रेनशी युद्धादरम्यान झालेला हा घटस्फोट पुतिन यांना खूपच झोंबला असल्याचं म्हटलं जातं.