नवी दिल्ली : लष्करी अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या वाईट वागणुकीचे गाऱ्हाणे मांडणारा व्हिडिओ आणखी एका जवानाने समाजमाध्यमांवर टाकल्याने हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.या व्हिडिओतील जवानाचे नाव सिंधव जोगीदास असे आहे, परंतु तो लष्कराच्या कोणत्या रेजिमेंटचा आहे हे स्पष्ट नाही. ‘सहायक’ म्हणून दिमतीला दिलेल्या जवानांना अधिकारी गुलामासारखी वागणूक देतात, असा त्याने आरोप केला आहे. जोगीदास एका अधिकाऱ्याच्या सेवेत सहायक म्हणून तैनात होता. रजेवरून परत यायला दोन दिवस उशिर झाल्यावर या अधिकाऱ्याने आपल्याला ‘आॅर्डर्र्ली’ म्हणून काम करण्यास सांगितले व त्यास नकार दिल्यावर आपल्याला सूडभावनेने दंडित केले गेले, असा असे त्याचे म्हणणे आहे.लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारला बिपिन रावत यांनी जवानांना तक्रारी व गाऱ्हाणी समाजमाध्यमांतून चव्हाट्यावर न मांडण्याची तंबी दिली होती. याचा अप्रत्यक्ष संदर्भ देत जवान जोगीदास या व्हिडिओमध्ये म्हणतो की, मलाही माझी कैफियत समाजमाध्यमांतून मांडण्याची इच्छा नव्हती. म्हणूनच मी रजा घेतली व पंतप्रधान कार्यालय आणि संरक्षणमंत्र्यांकडे दाद मागितली. परंतु त्यातूनही काही निष्पन्न न झाल्यावर मला नाईलाजाने समाजमाध्यमांचा आसरा घ्यावा लागला. तो म्हणतो की, गेल्या वर्षी २१ जानेवारी रोजी मी पंतप्रधान कार्यालयाकडे गेलो. हे कळल्यावर दोन वेळा ‘कोर्ट मार्शल’ची कारवाई करून मला वर्षभर त्रास देण्यात आला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आणखी एका जवानाची ‘व्हिडिओ’ तक्रार
By admin | Published: March 08, 2017 1:52 AM