अर्थव्यवस्थेच्या हाताळणीत सपशेल अपयशी ठरलेल्या महिंदा राजपक्षे यांच्या सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने रविवारी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली. यातून मार्ग काढण्यासाठी अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी विरोधी पक्षांना सरकारात सामील होण्याचे आमंत्रण दिले. मात्र, सरसकट सर्व विरोधकांनी अध्यक्षांचे हे आमंत्रण धुडकावून लावले. दरम्यान, आणीबाणीमुळे देशात निर्माण झालेली खदखद कायम आहे.
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत सोमवारी रात्रीपर्यंत सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू होती. मोठ्या संख्येने आंदोलक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या निवासस्थानाकडे कूच करताना दिसले. श्रीलंकेत लागू करण्यात आलेला ३६ तासांचा कर्फ्यू सोमवारी उठवण्यात आला आहे. त्यानंतर लोक रस्त्यावर उतरून सरकारविरोधी घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
आर्थिक संकटामुळे त्रस्त आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. कोलंबोतील फॉल्स रोडवर आंदोलकांना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाण्यापासून रोखण्यासाठी उभारण्यात आलेले बॅरिकेड्स आंदोलकांनी पाडले आहेत. सध्या श्रीलंकेच्या अनेक भागात सरकारविरोधात निदर्शनं सुरू आहेत. राजधानी कोलंबो शहरातील गॅले रोडवर आंदोलकांच्या समर्थनार्थ कार आणि इतर वाहनांमधील मोठ्या संख्येने लोक हॉर्न वाजवताना दिसले. सरकारविरोधी निदर्शनं तीव्र झाली असून नागरिक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
शेअर बाजाराचे सर्व व्यवहार ठप्प-
श्रीलंकेतील शेअर बाजार सोमवारी सकाळी उघडल्यानंतर काही सेकंदातच तिथले सर्व व्यवहार ठप्प झाले. मंत्रिमंडळातील सर्वच सदस्यांनी राजीनामा दिल्याच्या घडामोडीचा परिणाम होऊन शेअर बाजाराचा निर्देशांक ५.९ टक्क्यांनी घसरला. आर्थिक संकटाचाही मोठा तडाखा श्रीलंका शेअर बाजाराला बसला.