जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 21 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अनेक देशांत कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान कोरोनाला हलक्यात घेणं काही लोकांच्या जीवावर बेतलं आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली मास्कला कडाडून विरोध करणाऱ्याने आता कोरोनामुळे जीव गमावला आहे. 'अँटी मास्क आंदोलन' करणाऱ्या तरुणाचाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ही घटना घडली आहे. न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, कॅलेब वालेस असं या तरुणाचं नाव आहे. कॅलेबने कोरोनाच्या संकटात एक आंदोलन उभं केलं होतं. मास्क लावण्यास जबरदस्ती करणं हे स्वातंत्र्याच्या विरोधात आहे असं त्याचं म्हणणं होतं. यामुळेच त्याने मास्कला विरोध केला होता. कॅलेबची पत्नी जेसिका वालेसने दिलेल्या माहितीनुसार. 26 जुलै रोजी त्याच्यामध्ये कोरोनाची काही लक्षणं आढळून आली. मात्र त्याने रुग्णालयात उपचारासाठी जाण्यास नकार दिला. तब्येत आणखी बिघडल्याने त्याला 30 जुलै रोजी रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले.
रुग्णालयात उपचारादरम्यान त्याची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे कॅलेबला काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. याच दरम्यान त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कॅलेबला तीन मुलं आहेत. तर त्याची पत्नी आता पुन्हा एकदा गर्भवती आहे. कॅलेब वालेसने जुलै 2020 मध्ये सॅन एंजेलोमध्ये एक द फ्रीडम रॅली आयोजित केली होती. ज्या कार्यक्रमात त्याने लोकांना मास्क न लावण्याचा सल्ला दिला होता. कोरोनासंदर्भातील सर्व प्रोटोकॉल रद्द करण्याची देखील मागणी केली होती. मात्र आता त्यालाच कोरोनाने जीव गमवावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा विस्फोट! प्रगत अमेरिकाही हतबल, ऑक्सिजनची मोठी कमतरता; मुलांमध्ये संसर्गाचा धोका
अमेरिकेत कोरोनाचं घातक रुप पाहायला मिळत आहे. अनेक राज्यातील रुग्णालयात बेड आणि स्टाफची कमतरता होती. मात्र आता ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा, साऊथ कॅरोलिना, टेक्सास आणि लुईसियानासारख्या राज्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. डोना क्रॉस यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण ऑक्सिजन टँक हे 90 टक्के भरले जातात. जेव्हा टँकमध्ये 40 ते 50 टक्के ऑक्सिजन शिल्लक असतो तेव्हा तो टँक पुन्हा भरला जातो. मात्र आता 10 ते 20 टक्के ऑक्सिजन शिल्लक राहिल्यावर तो भरण्यात येत आहे.