वॉशिंग्टन : व्हाइट हाउसचा आक्षेप धुडकावून रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या अमेरिकी प्रतिनिधी सभेने पाकिस्तानविरोधी ‘राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण विधेयक’ (एनडीएए) संमत केले. हक्कानी नेटवर्कविरुद्ध कारवाई करण्यात अपयश आल्यास पाकला मिळणारी ४५ कोटी डॉलरची मदत रोखण्याची तरतूद या विधेयकात आहे.अमेरिकी प्रतिनिधी सभेने बुधवारी रात्री १४७ विरुद्ध २७७ मतांनी ‘एनडीएए’-२0१७ (एचआर ४९0९) पारित केले. त्यात तीन प्रमुख दुरुस्त्याही सामील करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे अमेरिकी खासदारांची पाकिस्तानविरोधी भावना ध्वनित होते. प्रतिनिधी सभेत मंजूर झालेल्या विधेयकानुसार मदत म्हणून पाकिस्तानला ४५ कोटी डॉलरची रक्कम जारी करण्यापूर्वी पाकिस्तानने अटींचे पालन केल्याचे प्रमाणपत्र ओबामा प्र्रशासनाने द्यावे लागेल.‘पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कच्या वरिष्ठ नेत्यांवर आणि मध्यम स्तरावरील टोळ्यांना पकडून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात प्रगती दाखविली आहे,’ ही ती मुख्य अट आहे. खासदार डाना रोहराबाथर यांच्या दुरुस्तीत आणखी एक अतिरिक्त आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. ओबामा यांनी त्यावर स्वाक्षरी केल्यानंतरच त्याचे रूपांतर कायद्यात होईल. याच आठवड्यात व्हाइट हाउसने विधेयकातील तरतुदींवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
अमेरिकेत पाकिस्तानविरोधी विधेयक मंजूर
By admin | Published: May 21, 2016 4:26 AM