सेऊल : उत्तर कोरियाने कोणत्याही क्षणी कोणत्याही स्थळी अणुचाचणी घेण्याचा इशारा दिल्याने कोरिया खंडात आधीच वाढलेल्या तणावात भर पडली असताना अमेरिकेने प्रत्युत्तरात लष्करी कारवाईची शक्यता नाकारलेली नाही.उत्तर कोरिया लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या किंवा सहाव्या अणुचाचणीच्या तयारीत असल्याच्या वृत्तानंतर गेल्या काही आठवड्यांपासून तणाव वाढत आहे. अमेरिकेने केलेल्या कारवाईच्या प्रत्युत्तरात कोणताही पर्याय निवडण्याची आमची पूर्ण तयारी आहे, असे उत्तर कोरियाच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने प्याँगयांग येथे म्हटले. अमेरिकेने वैमनस्याचे धोरण रद्द न केल्यास अणुहल्ल्याच्या क्षमतेची चाचपणी केली जाईल, असे उत्तर कोरियाच्या केसीएनए या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले. डेमोक्रॅटिक रिपब्लिक आॅफ कोरिया (डीपीआरके) या अधिकृत नावावर सहावी अणुचाचणी घेतली जाण्याचा संदर्भ देताना या प्रवक्त्याने कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी अणुचाचण्या घेण्याचा आदेश देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून दिला जाईल, असे स्पष्ट केले. उत्तर कोरियाने गेल्या ११ वर्षांमध्ये पाच अणुचाचण्या घेतल्या आहेत. अमेरिकेवर हल्ला केला जाईल असे क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या दिशेने या देशाने तयारी चालविल्याचे मानले जाते. दरवर्षी अमेरिका आणि दक्षिण कोरियाने संयुक्त कवायती घेतल्यानंतर उत्तर कोरिया आक्षेप नोंदवत आला आहे, यावेळी दोन्ही बाजूंनी हल्ल्याचा इशारा देण्यात आल्यामुळे आगीत तेल ओतले गेले आहे. उत्तर कोरियाने सशक्त अणुशक्ती असलेले राष्ट्र म्हणून विकास केला नसता तर अमेरिकेने अन्य देशांप्रमाणे आमच्यावरही हल्ल्यासाठी मागेपुढे पाहिले नसते, असेही हा प्रवक्ता म्हणाला. (वृत्तसंस्था)दु:साहस खपवून घेतले जाणार नाही- आॅस्ट्रेलियाउपखंडात शांतता राखण्यासाठी उत्तर कोरियाचे कोणतेही दु:साहस किंवा धोका खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी दिला आहे. द्वितीय जागतिक महायुद्धादरम्यान झालेल्या नौदल मोहिमेच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात ते ब्रिस्बेन येथे बोलत होते.सीआयएचे संचालक सेऊलमध्ये...उत्तर कोरियाकडून अणुचाचण्यांचा धोका वाढत असताना अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेचे संचालक माईक पोम्पिओ एका अंतर्गत बैठकीसाठी दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथे दाखल झाले आहेत. अमेरिकेच्या दूतावासाने त्याबाबत दुजोरा दिला. पोम्पिओ यांनी दक्षिण कोरियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बंदद्वार बैठकींची मालिका चालविली आहे.
कोणत्याही क्षणी अणुचाचण्या
By admin | Published: May 02, 2017 1:07 AM