ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - सौहार्दपूर्ण व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मिठीसाठीही प्रसिद्ध आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असतो, जपानचे शिंझो अॅबे असोत, फेसबूकचा मार्क झुकेरबर्ग वा नुकतेच भारत दौ-यावर येऊन गेलेले फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रँकॉई ओलांद.. त्या सर्वांची भेट घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना मारलेली मिठी हा चर्चेचा विषय होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना प्रिय मित्र बराक असं म्हणत मिठी मारणं असेल किंवा दहशतवादी हल्ला केलात तर तोडीस तोड उत्तर मिळेल असं सांगताना वाढदिवसी खास लाहोरला उतरून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना कवेत घेणं असेल, समोरच्या मान्यवरांना मिठी मारत आपलसं करायचा प्रयत्न करणं ही नरेंद्रभाई मोदींची खास स्टाईल आहे.
मात्र मोदींची ही मिठी सर्वांनाच आवडते असं नाही, काही जण तर त्यांच्या मिठीमुळे अवघडून जातात, पण तरीही येत्या काळात मोदींची ही सवय सुटण्याची चिन्हे नाहीत. तीन दिवसांच्या भारत दौ-यावर आलेले फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद आणि मोदी यांची चंदीगडमध्ये झालेली भेट आणि रॉक गार्डनमधील त्यांचे फोटो, मोदींनी त्यांना मारलेली मिठी, या सर्व गोष्टींवरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. मोदींच्या मिठीमुळे ओलांदही अवघडल्याचे दिसत होते, रॉक गार्डनमध्ये ओलांद वळले असतानाही मोदींनी मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचे फोटोंवरून दिसून येते.
वॉशिंग्टन पोस्टने गेल्या वर्षी बीबीसीवर मोदींचे चरीत्रकार निलांजन मुखोपाध्याय यांनी दिलेले मत उद्धृत केलेआहे. मुखोपाध्याय म्हणतात, जगामधल्या महत्त्वाच्या व्यक्तिंना मिठी मारण्याचा मोदींचा प्रघात हा त्यांचा, आपण दोघे एकाच पातळीवर आहोत हे सांगण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. या मिठीतून मोदी संदेश देतात, की ते बरोबरीचे आहेत, मित्र आहेत आणि त्यांचे संबंध जिव्हाळ्याचे आहेत.
मोदींच्या जादू की झप्पीची काही उदाहरणं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Dear Friend बराक ओबामासह
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासह
अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद करझाई यांच्यासह
जपानचे पंतप्रधान व जुने स्नेही शिंझो एब यांच्यासह
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्कसह
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबटसह