ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कडक इशा-यानंतर अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटने माफी मागितली आहे. स्वराज यांना पत्र लिहून अॅमेझॉनने माफी मागितली आहे. कॅनडा येथील अॅमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली होती.
'भारतीयांच्या भावनांचा आम्ही आदर करतो, त्यांच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. त्या पायपुसण्या थर्ड पार्टीकडून विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या'. असं पत्र अॅमेझॉनकडून सुषमा स्वराज यांना पाठवण्यात आलं आहे.
ही बाब एका नागरिकाने निदर्शनास आणून दिल्यानंतर याची दखल घेत स्वराज यांनी त्या पायपुसण्यांची विक्री त्वरित थांबवण्यास आणि बिनशर्त माफी मागण्यास सांगितले होते. यानंतर अॅमेझॉननं त्वरित वेबसाइटवरील तिरंग्याचा अपमान करणारी पायपुसणी हटवली.
'आमच्या तिरंग्याचा अपमान करणा-या सर्व उत्पादनांना त्वरित हटवा अन्यथा आम्ही अॅमेझॉनच्या अधिका-यांना व्हिसा देणार नाही तसेच सध्या ज्या अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांकडे भारताचा व्हिसा आहे, त्यांचा व्हिसा रद्द करू', असा इशारा स्वराज यांनी ट्विटरद्वारे दिला होता.
अतुल भोबे नावाच्या एका व्यक्तिने स्वराज यांना ट्विट करुन कॅनडामध्ये विकल्या जात असलेल्या या पायपुसणीबद्दल माहिती देत यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर सुषमा स्वराज यांनी तातडीने कॅनडातील भारतीय उच्च-आयोगाला हे प्रकरण अॅमेझोन कॅनडाच्या उच्च अधिका-यांच्या निदर्शनास आणण्यास सांगितले होते.