Apple iPhone plant in China : ॲपल इंकच्या चीनमधील मुख्य आयफोन उत्पादन प्रकल्पात शेकडो कामगार आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात संघर्ष झाल्याची घटना घडली आहे. कोरोना महासाथीला नियंत्रणात आणण्यासाठी जवळपास महिनाभरापासून घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण होतं. दरम्यान, विरोधासाठी करण्यात येत असलेल्या एका आंदोलनातील एका व्यक्तीनं फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपच्या (Foxconn Technology Group) प्रकल्पातील एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये अनेक कर्मचारी सकाळी डॉरमेट्रीजमधून बाहेर आले आणि त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांसह धक्काबुक्कीही केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
एका अन्य व्हिडीओमध्ये काही सफेद कपडे परिधान केलेले लोक एका व्यक्तीला जमिनीवर पाडून मारतानाही दिसत आहेत. त्या ठिकाणी असलेल्या काही लोकांनी बॅरिकेट्सही पार केली आणि घोषणाबाजीही केली. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीलाही घेराव घातल्याची घटना घडली.
…म्हणून संतापप्रत्यक्षदर्शींनुसार वेतन न मिळणं आणि कोरोनाचा संसर्ग पसरण्याच्या शक्यतांमुळे रात्रीच आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसही घटनास्थळी पोहोचल्याचं एका व्यक्तीनं म्हटलं. तर दुसरीकडे आणखी एका व्हिडीओमध्ये एका कॉन्फरन्स रुममध्ये असलेल्या मॅनेजरला काही कर्मचाऱ्यांनी घेराव घातला आणि त्यांना आपल्या कोरोनाच्या रिपोर्टबद्दल विचारणा करत असल्याचंही दिसलं.
या जागेबद्दल आम्हाला भीती आहे. आम्ही सर्वजण कोविड पॉझिटिव्ह असू शकतो. तुम्ही आम्हाला मरणाच्या दारात ढकलत आहात, असं एका पुरुष कर्मचाऱ्यानं म्हटलं. तर फॉक्सकॉनच्या प्रतिनिधींकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"