बँकॉक : लष्करी बंडाला विरोध करणार्या आंदोलकांना रोखण्यासाठी बँकॉकमध्ये रविवारी सहा हजार पोलीस व सैनिक तैनात करण्यात आले. आंदोलकांनी लष्कराविरुद्ध फ्लॅशमॉब रॅलींची धमकी दिली असल्याची माहिती एका अधिकार्याने दिली. २२ मे रोजी लष्कराकडून पंतप्रधान इंगलुक शिनवात्रा सरकार उलथवून टाकल्यापासून राजधानी बँकॉकमध्ये दररोज तीव्र आंदोलने होत आहेत. लष्करप्रमुख प्रयुत चान-ओ-चा यांनी इशारा दिला की, आंदोलक आणि त्यांच्या परिवाराला कठोर लष्करी कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते. तथापि, आतापर्यंत काहींना अटक केली असली तरी बळाचा वापर टाळण्यात आला आहे. आंदोलक बँकॉक शहरात मोर्चा, फेर्या काढणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्यानंतर शहरात सहा हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले. कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये यासाठी अनेक रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. ‘आम्ही बँकॉकमध्ये आठ ठिकाणी पोलीस व लष्कराच्या ३८ संयुक्त तुकड्या तैनात केल्या आहेत, असे राष्ट्रीय पोलीस उपप्रमुख सोमयोत पूमपानमोंग यांनी सांगितले. परिस्थिती सामान्य असून कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांचे संकेत नाहीत, असेही ते म्हणाले. थायलंडमध्ये गेल्या वर्षभरापासून राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे.
थायलंडमध्ये आंदोलकांना रोखण्यासाठी लष्कर तैनात
By admin | Published: June 02, 2014 6:12 AM