दोन देशांमध्ये युद्ध सुरू झालं की त्याची झळ स्वाभाविकच तिथल्या सामान्य नागरिकांना बसते. महिला आणि मुलांवर अत्याचार होतात. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेलं युद्ध काही थांबायचं नाव घेत नाही. बलाढ्य रशियाशी दोन हात करायला सर्वस्वाची बाजी युक्रेनकडून लावण्यात येत आहे.
अशात सीमेवर लढत असलेल्या सैनिकांना सर्वतोपरी मदत म्हणून युक्रेनमधील महिलांनी सैनिकांसाठी विशेष प्रकारचे ‘किकिमोरा वॉरसूट्स’ विणण्याचं काम हाती घेतलंय. या सगळ्या महिला ‘होरेन्स्की मावका’ नावाच्या कम्युनिटीचा भाग आहेत.
प्रत्येकीला युद्धाची काही ना काही झळ बसलीच आहे. कुणाचा मुलगा सीमेवर रशियन सैनिकांशी लढतोय. तो धडधाकट परत येईल ना? या काळजीने तिला पोखरलंय. कुणाचं कुटुंबच्या कुटुंब निर्वासित छावणीत दिवस काढतंय. विखुरलेले कुटुंबीय आपल्याला परत कधी भेटतील, याकडे तिचं लक्ष लागलंय.
प्रत्येकीचं दुःख मोठं आहे, तरी ते बाजूला ठेवून आपल्या सैन्यासाठी खास सूट्स विणण्याच्या कामी त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलंय.
‘होरेन्स्की मावका’ ही कम्युनिटी युक्रेनी लोककथांचा एक भाग आहे. जिवंत आणि मृत यांच्यादरम्यान त्यांचं अस्तित्व असतं, असं युक्रेनी मानतात. पण लोककथांमधून आता मावका महिलांनी वर्तमान जगातल्या प्रश्नांमध्ये लक्ष घातलं आहे. हा युक्रेनी महिलांचा समूह ‘अँग्री मावका’ म्हणूनही ओळखला जातो.
रशियन आक्रमणापासून आपल्या सैनिकांचं रक्षण करण्यासाठी खास प्रकारचे वॉरसूट्स त्या महिला विणतात. होरेंका हे युक्रेनच्या बुचा जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. रशियाने २०२२ मध्ये हे गाव उद्ध्वस्त केलं. सर्वसामान्य नागरिकांचं शिरकाण केलं. त्यामुळे माणसंच्या माणसं मातीआड गेली.
होरेन्स्की मावका ही खरंतर शांततेचा पुरस्कार करणारी कम्युनिटी. पण रशियाच्या हल्ल्यानंतर शत्रूविरुद्ध लढण्यासाठी सैन्याला बळ देण्यात आपला खारीचा वाटा म्हणून मावका कम्युनिटीतील महिलांनी सैनिकांसाठी सूट्स विणण्याचं काम सुरू केलं.
पूर्वीच्या काळी युक्रेनी महिला विणकाम, भरतकामासाठी एकत्र येत, गाणी म्हणत, गप्पा मारत, प्रार्थना करत. हे सूट्स विणण्याच्या निमित्ताने ते पुन्हा सुरू झालं आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ हे काम सुरू आहे. रशियन क्षेपणास्त्रांचा हल्ला टाळण्यासाठी जेव्हा ब्लॅकआऊट्स केले जातात, तेव्हाही मेणबत्तीच्या प्रकाशात हे काम सुरूच असतं.
रशिया - युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर २०१४ मध्ये ॲलेना ग्रोम नावाच्या फोटोग्राफरला आपलं गाव सोडून जावं लागलं. हे विशेष किकिमोरा सूट्स घातलेल्या युक्रेनी महिलांच्या फोटोंचं प्रदर्शन लंडनच्या सॉमरसेट हाऊसमध्ये ॲलेनाने नुकतंच भरवलं आणि मावका महिलांच्या कामाला जागतिक नकाशावर ओळख मिळवून दिली. ॲलेनाने आपल्या कॅमेऱ्यामधून टिपलेल्या प्रत्येकीची काही ना काही गोष्ट आहे. ती गोष्ट सांगण्यासाठी ॲलेना प्रयत्न करते आहे. रशियाबरोबर सुरू असलेलं युद्ध हे युक्रेनींची सत्वपरीक्षा पाहणारं आहे, पण त्याही परिस्थितीत एकमेकांबरोबर उभं राहण्याच्या जिद्दीमुळेच ही सत्वपरीक्षा आम्ही निभावून नेत आहोत, असं ॲलेना म्हणते.