जगभर : शत्रूवर हल्ला - आता ‘सुसाइड ड्रोन’ची चलती; किती घातक आहेत हे ड्रोन?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 07:52 AM2024-11-21T07:52:35+5:302024-11-21T07:54:15+5:30

Suicide Drones: हे ड्रोन म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं हल्लेखोर हत्यार आहे, जे लक्ष्य साधून त्याच्यावर धडक मारतं.

around the world What is the suicide drone being sent from North Korea to Russia? | जगभर : शत्रूवर हल्ला - आता ‘सुसाइड ड्रोन’ची चलती; किती घातक आहेत हे ड्रोन?

जगभर : शत्रूवर हल्ला - आता ‘सुसाइड ड्रोन’ची चलती; किती घातक आहेत हे ड्रोन?

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव नाही. उलट दिवसेंदिवस ते चिघळतच चाललं आहे. उत्तर कोरिया आणि या देशाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचा या युद्धात रशियाला छुपा किंवा खुला पाठिंबा आहे, हे लपून राहिलेलं नाही. किम जोंग उन यांनी आपले अनेक सैनिक या युद्धात रशियाच्या बाजूनं लढण्यासाठी पाठवले आहेत. 

रशियाच्या पाठिंब्यात वाढ करताना किम जोंग उन यांनी ‘सुसाइड ड्रोन’ची मदत रशियाला करण्याचा निर्णय तर घेतला आहेच; पण शत्रूवर हल्ला करण्यासाठी हे सुसाइड ड्रोन खूपच उपयुक्त असल्यामुळे या ड्रोनची निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढवा, असा आदेश त्यांनी उद्योजकांना दिला आहे. यानंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही त्यांनी बैठक घेतली आणि सैन्याची क्षमता वाढवण्याचा आदेश दिला. 

सुसाइड ड्रोन म्हणजेच आत्मघाती ड्रोन ! हे ड्रोन म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं हल्लेखोर हत्यार आहे, जे लक्ष्य साधून त्याच्यावर धडक मारतं. साधारणपणे ड्रोन विमानं शत्रूच्या प्रदेशात जाऊन ‘गुप्तचराचं’ काम करतात किंवा शस्त्रांचा मारा करतात; पण आत्मघाती ड्रोन त्याच्या विरोधात स्वत:लाच लक्ष्यावर धडक मारण्यासाठी तयार केलेले असतात. हे ड्रोन लक्ष्याचा तर नाश करतातच; पण त्याचबरोबर स्वतःही नष्ट होतात. शक्तिशाली विस्फोटकांनी ते भरलेले असतात.

रशिया आणि इराणसारख्या देशांनी आपल्या लष्करी ताकदीमध्ये वाढ करण्यासाठी आत्मघाती ड्रोनवर विशेष काम केलं आहे. विशेषतः इराणच्या ‘शाहिद-१३’सारख्या ड्रोननं या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या ड्रोनची रचना अशा प्रकारे करण्यात आलेली असते की ते कमी उंचीवर उड्डाण करत लक्ष्यावर अत्यंत वेगानं आणि अचूकपणे धडक मारतात. या ड्रोनला शोधणं, ट्रॅक करणं कठीण असतं, ज्यामुळे ते शत्रूंसाठी घातक ठरतं. रशिया याच ड्रोनचा वापर करून युक्रेनमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

आत्मघाती ड्रोनची घातकता या शस्त्राच्या तंत्रज्ञानात आणि त्याच्या कार्यक्षमतेत आहे. हे ड्रोन सतत नियंत्रणाखाली ठेवलं जाऊ शकतं किंवा स्वयंचलित पद्धतीनंही ते मार्गक्रमण करू शकतं. आत्मघाती ड्रोन मोठ्या प्रमाणावर विस्फोटक सामग्री सोबत घेऊन जातात. हे ड्रोन रडारवर शोधता येत नाहीत. त्यामुळे ते सहजतेने शत्रूच्या परिसरात प्रवेश करू शकतात. या ड्रोनमध्ये अत्यंत अचूक लक्ष्य साधण्याची क्षमता असते. कमीत कमी संसाधनं वापरून जास्तीत जास्त नुकसान करण्याची क्षमता या ड्रोनमध्ये असल्यामुळे संपूर्ण जगात आता हेरगिरी करण्यासाठी आणि तिथल्या परिसरात विध्वंस करण्यासाठी हे ड्रोन वापरले जातात. 

लहान स्वरूप, तुलनेनं कमी किमती आणि सहजतेनं बदलता येणारी रचना यामुळे हे ड्रोन अलीकडच्या काळात प्रचंड लोकप्रिय होत आहेत.  मात्र अशा ड्रोनचा वापर नागरी ठिकाणी होतो, तेव्हा त्याचा प्रभाव अधिक विध्वंसक असतो. सर्वसामान्यांच्या आयुष्यावर त्याचा भयानक परिणाम होऊ शकतो. आता या ड्रोनपासून वाचण्यासाठी, त्यांच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं रडार प्रणालींमध्ये सुधारणा, एअर डिफेन्स सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंग यंत्रणेचा वापर करून अशा ड्रोनना वेळीच शोधणं आणि नष्ट करणं असे पर्याय तपासले जात आहेत, मात्र त्यात अजून हवं तितकं यश मिळालेलं नाही. त्यासाठी अजून काही काळ जावा लागेल; पण तोपर्यंत हे ड्रोन किती विध्वंस करतील हे सांगता येत नाही. 

रशिया-युक्रेन युद्धानं आत्मघाती ड्रोनसारख्या घातक शस्त्रांचा वापर करून जगासमोर एक नवीन आव्हान उभं केलं आहे. या तंत्रज्ञानाचे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. त्याचा वापर कोणी, कसा करायचा यावरही आता चर्चा आणि वाद-विवादांच्या फेऱ्या होताहेत.

रशिया आणि उत्तर कोरिया यांनी एका गुप्त समझोत्यानुसार काही काळापूर्वीच एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यानुसार दोन्ही देश एकमेकांच्या सुरक्षेसाठी तर मदत करतीलच; पण त्यांच्यावर कोणी ‘शत्रू’ राष्ट्रानं आक्रमण केलं तर त्यालाही ते एकत्रितपणे प्रत्युत्तर देतील. सध्या रशियाच्या बाजूनं युक्रेनविरुद्ध लढताना उत्तर कोरियानं रशियाच्या पश्चिम सीमेवर आपले सैनिक तैनात केले आहेत.

ड्रोन आणखी घातक होणार! 

सुसाइड ड्रोन अधिक कार्यक्षम आणि शक्तिशाली करण्यावर आता भर दिला जात आहे. त्यांचा आकार आणखी लहान आणि त्यांची विनाशक क्षमता वाढवली जात आहे. भविष्यात रडारची क्षमता वाढली, तरी त्यावरही मात करण्याचा हा प्रयत्न आहे. या ड्रोनचं वैशिष्ट्य म्हणजे हवा, पाणी आणि जमीन कुठूनही या ड्रोनद्वारे हल्ला करता येऊ शकतो. शिवाय मानवरहित असल्यानं कोणताही धोका पत्करता येऊ शकतो.

Web Title: around the world What is the suicide drone being sent from North Korea to Russia?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.