जगात सगळ्याच देशांत सध्या खूप मोठ्या प्रमाणावर उलटफेर चालू आहेत. जगाचं राजकारण एका वेगळ्याच दिशेनं चाललं आहे. अमेरिका, इस्रायल, युक्रेन, रशिया, इराण, इराक, उत्तर कोरिया, चीन... प्रत्येक देश एका वेगळ्या मानसिकतेतून जात आहे. जगाच्या पुढे राहण्याची अहमहमिका सगळीकडे सुरू आहे. जगात भले वैज्ञानिक प्रगती झाली असेल, पण सारेच देश वैचारिक अधोगतीकडे चालले आहेत, असं अनेक विचारवंतांचं म्हणणं आहे.
जगात सध्या नव्यानं चर्चा सुरू झाली आहे ती इराणची आणि त्यांच्या नव्या सुप्रीम लीडरची! अयातुल्ला अली खामेनेई हे इराणचे सध्याचे सुप्रीम लीडर; पण सध्या ते ८५ वर्षांचे आहेत आणि तब्येतीच्या कारणानं त्रस्त आहेत. गंभीर आजारी असल्यामुळे मरणापूर्वी आपलं पद दुसऱ्या कोणा तरी ‘सक्षम’ व्यक्तीच्या हाती जावं, असं त्यांना वाटत होतं. गेल्या काही काळात त्यांनी ते बोलूनही दाखवलं होतं. त्यामुळे दुसरा सक्षम नेता, उत्तराधिकारी निवडताना त्यांनी आपल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मुलाला इराणचा सुप्रीम लीडर बनवलं आहे आणि त्याच्याकडे सर्व जबाबदारी सोपवली आहे.
त्यांनीही आपल्या मुलालाच उत्तराधिकारी निवडून जगभरातील अनेक देशांतील ‘परंपरा’ जपली असली तरी त्यांनी आपल्या सर्वांत ज्येष्ठ मुलाकडे ही जबाबदारी का सोपवली नाही, यावरूनही सध्या इराणमध्ये आणि जगभरात तर्कवितर्क सुरू आहेत. त्यांनी ज्यांना आता इराणचा सुप्रीम लीडर बनवलं आहे, त्यांचं नाव आहे मुजतबा खामेनेई. ते फारसे प्रसिद्धीच्या झोतात राहत नसले आणि ‘पडद्यामागून’ सारी सूत्रं हलवत असले तरी मुजतबा ही काय चीज आहे, ते इराणमधील लोकांना आणि इतरही अनेक देशांना चांगलंच माहीत आहे.
या गोष्टीला अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी अंतर्गत सूत्रांनी ही बातमी खरी असल्याचं ठामपणे सांगितलं आहे. मुजतबा यांच्याइतका अस्सल ‘पर्याय’ दुसरा कोणीही नाही, असंही अनेकांचं म्हणणं आहे. मुजतबा यांना इराणचे सुप्रीम लीडर बनवण्याची तयारी तब्बल दोन वर्षांपासून सुरू होती. त्याला आता मूर्त रूप आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सरकारमध्ये त्यांनी कोणतंही महत्त्वाचं पद घेतलेलं नाही, किंबहुना सत्तेपासून ते दूरच आहेत; पण सत्ताधाऱ्यांचं त्यांच्याशिवाय पानही हलत नाही, हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांच्या शब्दाला तिथे अतिशय किंमत आहे. अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना मुजतबा खामेनेई यांचा शब्द अंतिम मानला जातो.
माध्यमांचंही म्हणणं आहे की, मुजतबा हे एक रहस्यमयी व्यक्तिमत्त्व आहे. ते कोणत्या वेळी काय करतील, कोणता निर्णय घेतील, हे कोणालाही सांगता येणार नाही. अनेक गोष्टी तर त्यांनी निर्णय घेतल्यानंतर काही काळानं लोकांना कळतात. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे इतर नेत्यांप्रमाणे ते ना लोकांमध्ये मिसळत, ना लोकांना फारसे भेटत, ना कुठे सहजपणे नजरेस पडत.
आपल्या वडिलांप्रमाणे भाषणबाजी करण्याचीही त्यांना सवय नाही; पण ‘न बोलता’ ते इतक्या गोष्टी करून जातात, की या कानाची खबर त्या कानाला लागत नाही; पण त्याचे परिणाम मात्र अत्यंत दूरगामी होतात. प्रत्येक ठिकाणी त्यांची नजर असते, देशात कुठे, काय चालू आहे, हे त्यांना माहीत असतं. प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी आपले ‘खबरे’ पेरलेले आहेत. केवळ सरकारमध्येच नाही, तर गुप्तचर संस्थेमध्येही त्यांनी आपली माणसं पेरून ठेवलेली आहेत.
इराणमध्ये इब्राहिम रईसी राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तर त्यांचं वजन फारच वाढलं होतं. रईसी यांचे उत्तराधिकारी म्हणून मुजतबा यांनाच राष्ट्राध्यक्ष करण्याची तयारीही सुरू होती; पण रईसी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी पुन्हा आपले फासे पलटले आणि नवी चाल खेळली.
मुजतबा हे आपल्या वडिलांप्रमाणेच धार्मिक बाबतीतले जाणकार आहेत, पण पहिल्यांदा ते जगाच्या आणि इराणच्या नजरेत भरले ते २००९मध्ये. त्यावेळी सुधारणावादी नेते मीर हुसेन मौसवी यांच्यावर मात करून कट्टरपंथी नेते महमूद अहमदीनेजाद निवडून आले होते. भ्रष्ट मार्गांनी ही निवडणूक जिंकली गेली, असा आरोप यावेळी झाला होता आणि लक्षावधी लोक त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते.
लो प्रोफाइल डोकेबाज नेता!
इराणमधील आंदोलनाला ‘इराणी ग्रीन मूव्हमेंट’ नाव दिलं गेलं होतं. तब्बल दोन वर्षं हे आंदोलन सुरू होतं; पण इराणी सरकारनं बळाच्या जोरावर हे आंदोलन चिरडलं. या आंदोलकांना ‘शांत’ करण्यात मुजतबा यांचा मोठा हात होता आणि त्यांनी शांत डोक्यानं हे आंदोलन संपवलं असं मानलं जातं. इराण-इराक युद्धातही त्यांचा फार मोठा वाटा होता. ते कायम ‘लो प्रोफाइल’ राहिले. त्यांच्या कारवायांमुळे २०१९मध्ये अमेरिकेनं त्यांच्यावर बंदी घातली होती.