अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील अरीफ हा तरुण. त्याचं एक छोटंसं रेडिमेड कापडांचं दुकान आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत त्याच्या दुकानात महिलांचे सर्व प्रकारचे फॅशनेबल रेडिमेड कपडे मिळत होते. मागच्या आठवड्यात अचानक चित्र बदललं आणि त्याच्या दुकानात सगळीकडे, दोरीवर, खुंटीला, दाराला, हुकांना, रस्त्यावर निळं कापड दिसायला लागलं. बाकी सारे रंगीबेरंगी फॅशनेबल कपडे तिथून गायब झाले ! ते निळं कापड खरेदी करण्यासाठी त्याच्या दुकानात अगदी सुशिक्षित आणि तरुण मुली, बायकांनी गर्दी करायला सुरुवात केली. गेल्या कित्येक वर्षांत त्याच्या दुकानातून हे कापड अपवादानंच विकलं गेलं होतं.
काय होतं हे निळं कापड..- सध्या तरी महिलांना किमान जगता येईल, त्यांना तालिबान्यांपासून काही काळ तरी वाचवू शकेल असं एकमेव ‘संरक्षक कवच’.. ते म्हणजे ‘बुरखा’! दोन दशकांपूर्वी हाच निळा बुरखा तालिबानी अंमलाखालील महिलांच्या घुसमटीचं प्रतीक होता ! अरिफ म्हणतो, अगदी काही दिवसांपूर्वी माझ्या दुकानातून बुरखे अपवादानेच विकले जात होते. ग्रामीण भागातील एखादी वयस्कर महिला दुकानात आली, तर ती बुरखा मागायची. बऱ्याच दिवसांत हात न लागलेले, धुळीनं माखलेले हे बुरखे मी कपाटाच्या तळाशी असलेल्या खणांतून ओढून काढून, झटकून, पुसून ते त्या महिलेच्या समोर धरायचो.. आता प्रत्यक्ष काबूल शहरातल्याच सुशिक्षित, श्रीमंत स्त्रिया, कॉलेजात जाणाऱ्या तरुणी, त्याच बुरख्यासाठी माझ्याकडे गर्दी करताहेत. ज्यांना माझ्या उभ्या आयुष्यात कधीही मी बुरख्यात पाहिलं नाही, अशा तरुण मुली रांगा लावून आता बुरखे खरेदी करताहेत.
आरिफच्या शेजारी असलेल्या दुकांनाचीही हीच तऱ्हा. विविध कपडे किंवा वस्तू विकणाऱ्या या दुकानांची जागा झटक्यात बुरखाविक्रीनं घेतली. कारण बुरखा हे आता तिथल्या मार्केटमध्ये अचानक एक चलनी नाणं झालं आहे. काही दिवसांपूर्वी जे बुरखे दीडशे-दोनशे ‘अफगानी’मध्ये (अफगाणिस्तानचं चलन) मिळत होते, त्यांची किंमत रात्रीतून दोन हजार, तीन हजार अफगानी इतकी झाली !
तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला आणि ताबडतोब तिथे ‘तालिबानी संस्कृती’ दिसायला लागली. तालिबानी एक एक करून प्रांत काबीज करत असतानाच अनेक महिलांनी दुकानांमध्ये बुरख्याची शोधाशोध सुरू केली !.. मिळेल तिथून बुरखे खरेदी केले. लगोलग तालिबान्यांनी ठिकठिकाणी आपले फतवे जारी केलेच, महिलांनी घराबाहेर पडायचं नाही, बुरखा सक्तीचा, नाहीतर त्यांची खैर नाही.
१९९६ ते २००१ हा यापूर्वीच्या तालिबानी सत्तेचा काळ ज्यांनी पाहिला आहे, त्या महिलांच्या अंगावर तर लगेच काटा उभा राहिला. बुरखा न घातलेल्या मुली, स्त्रियांना रस्त्यावर चाबकानं कसं फोडून काढलं जायचं याचं चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. काही महिलांनी तर स्वत:च हा जीवघेणा अनुभव घेतला होता. त्यांना आता पुन्हा त्या वेदनादायी अनुभवातून जायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी लगेच स्वत:हूनच बुरखा घालायला सुरुवात केली....पण याच बुरख्याच्या सक्तीमुळे विशेषत: काबुलसारख्या शहरात पालकांपुढे एक मोठंच सांस्कृतिक प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण काबूलमध्ये जवळपास ४० टक्के संख्या तरुणाईची आहे. त्यातील एकालाही तालिबानची राजवट माहिती नाही किंवा त्यांनी ती प्रत्यक्ष अनुभवलेली नाही. विशीच्या आतील अनेक तरुणींना तर बुरखा घालणंच माहीत नाही. कारण त्यांच्या जन्मापासून कायम त्यांनी आपल्या आवडीचे कपडे परिधान केले होते. या मुलींच्या आयांनीही मधल्या काळात बुरखा वापरणं सोडलं असलं तरी हा अचानक झालेला बदल त्यांनी लगेच स्वीकारला, कारण जगायचं, तर सध्या तरी ‘बुरखाच आपला संकटमोचक आहे’, हे त्यांना माहीत आहे. पण अनेक तरुणींनी याविरुद्ध बंड करताना कुठल्याही परिस्थितीत आम्ही बुरखा घालणार नाही, असा पवित्रा घरात घेतला आहे. त्यांना मनवता मनवता पालकांच्या नाकीनव आल्याचं काही वृत्तांत सांगतात.
ये तो नाइन्साफ हैं..काबूलमधील २२ वर्षीय हबीबा आणि तिच्या बहिणांनी बुरखा घालावा म्हणून त्यांचे पालक त्यांची अक्षरश: विनवणी करताहेत, पण त्यांनी बुरखा घालायला साफ नकार दिला आहे. हबीबा संतापानं म्हणते, मी बुरखा घातला म्हणजे आपोआपच मी ‘त्यांच्या’ सत्तेला मान्यता दिली आणि ‘माझ्यावरचा त्यांचा हक्क’ मान्य केला असा होतो. मला हे कदापि मंजूर नाही.काबूलमधील अमूल नावाच्या एक तरुण मॉडेल-डिझायनरनं मोठ्या कष्टानं आपला व्यवसाय उभा केला आहे. ती म्हणते, आतापर्यंत माझं सगळं आयुष्य अफगाणी महिलांचं स्वातंत्र्य, सौंदर्य, त्यांच्या सौंदर्याची विविधता आणि क्रिएटिव्हिटी दाखविण्यात गेली आहे.. अचानक हे सगळं मी कसं काय बंद करू? अनेक तरुण मुली म्हणताहेत, चेहरा नसलेल्या महिलेचं प्रतीक म्हणून आम्ही आजवर बुरख्याकडे पाहत आलो आहोत. त्याच बुरख्याआड आम्ही आता स्वत:ला अगदी घरातही कैद करून घ्यायचं? ..