पोलीस, बॉम्बशोधक पथक, सुरक्षा जवान यांच्या ताफ्यात असलेले कुत्रे आणि त्यांचा उपयोग आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अनेक मोठमोठे गुन्हे तसेच गुन्हेगार शोधण्यात, स्फोटकांचा तपास लावण्यात, कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत असलेल्या माणसांना हुडकण्यात, अनेक आपत्तीत माणसांना वाचवण्यात या कुत्र्यांचा फार मोठा वाटा असतो.
आजवर जगात अनेक ‘स्निफर डॉग्ज’नी आपल्या वास घेण्याच्या क्षमतेने पोलिसांच्या शोधकार्यात मदत केली आहे? आणि हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत; पण ‘रॅट स्क्वॉड’ किंवा आपल्या वास घेण्याच्या क्षमतेमुळे पोलिसांची मदत करताना आजवर हजारो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या उंदराबाबत तुम्ही कधी ऐकलं आहे? - हो असा एक उंदीर आहे. त्यानं आजवर अनेक स्फोटकांचा गुन्ह्यांचा शोध लावताना हजारो माणसांचे प्राण वाचवले आहेत. तब्बल पाच वर्षं त्यानंहे काम केलं आहे. या उंदराचं नाव आहे? मसावा. कंबोडियामध्ये पाच वर्षे सरकारी सेवा इमाने इतबारे बजावल्यानंतर नुकतंच त्याला सन्मानानं निवृत्त करण्यात आलं आहे.
कंबोडियामध्ये गृहयुद्धाच्या दरम्यान ठिकठिकाणी, जंगलात जमिनीखाली दारुगोळा, स्फोटकं, सुरुंग पेरण्यात आले होते. तिथून जाणाऱ्या-येणाऱ्या व्यक्तीचा पाय चुकून त्यावर पडला की त्याच्या दबावानं हे सुरुंग फुटायचे, मोठा स्फोट व्हायचा आणि मोठं नुकसान होऊन माणसं मृत्युमुखी पडायची. जगभरात यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. कारण कंबोडियात जिथे विश्वप्रसिद्ध अंकोरवाट मंदिर आहे, त्या परिसरात प्रामुख्यानं ही स्फोटकं पेरलेली होती. हे जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे, शिवाय इथलं सृष्टीसौंदर्यही अतिशय विलक्षण आहे. त्यामुळे ते पाहण्यासाठी विविध देशांतील आणि विविध जातीधर्माचे लोक हे मंदिर पाहण्यासाठी येत असतात. स्फोटकांवर पाय पडल्याने त्यात अनेकांचा आजवर मृत्यू झाला आहे किंवा ते जखमी झाले आहेत.
सततच्या या स्फोटांमुळे कंबोडियन सरकार त्रस्त झालं होतं, हे भूसुरुंग कसे शोधून काढावेत या प्रयत्नात ते होते. त्याचवेळी बेल्जियममधील एक धर्मादाय संस्था ‘अपोपो’ यांना एक भन्नाट कल्पना सुचली. टांझानिया येथे काही खास जातीच्या उंदरांची जमात आढळते. त्यांची वास घेण्याची क्षमता विलक्षण आहे. त्यांनी तिथून काही उंदीर मागवले आणि त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यातल्याच एका उंदराला कंबोडियात पाठवण्यात आलं. त्याचंच नाव मसावा. त्याच्यासोबत काही स्वयंसेवकही गेले. मसावाच्या मदतीनं त्यांनी कंबोडियातील स्फोटकांचा तपास लावण्याचं काम सुरू केलं.
‘अपोपो’चे प्रोग्राम मॅनेजर मायकल हेमेन सांगतात, मगावाची वास घेण्याची क्षमता इतकी तीव्र आहे, की आतापर्यंत तब्बल ७१ भूसुरुंग आणि ३८ विस्फोटकांचा शोध लावून अनेकांचे प्राण त्यानं वाचवले आहेत. त्याच वय आता सात वर्षं आहे आणि दोन वर्षांचा असतानाच तो कंबोडियाच्या सरकारी सेवेत दाखल झाला होता. पाच वर्षांत त्यानं तब्बल दोन लाख २५ हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रातील स्फोटकं हुडकून काढली आहेत. हे क्षेत्र जवळपास ४२ फुटबॉल मैदानांइतकं आहे. मसावा अजूनही फिट आहे, त्याची शारीरिक क्षमताही चांगली आहे, पण खूप काम केल्यानं आणि वयोमानानुसार तो आता थकला आहे. तो अजूनही काम करू शकतो आहे; पण त्याची क्षमता आता हळूहळू कमी होत आहे. वयाचा परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा आणि सन्मानानं निवृत्त करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आपल्या आवडीचं काम करण्यासाठी आणि आवडेल ते खाण्यापिण्यासाठी तो आता मुक्त असेल.
मसावा दोन वर्षांचा असताना, २०१६ मध्ये त्याला कंबोडियात आणण्यात आलं. त्यानंतर त्यानं अनेक स्फोटकांचा शोध लावला. त्याआधी जिथून त्याला आणण्यात आलं, त्या टांझानियामधील एका केमिकल फॅक्टरीतही त्यानं काम केलं होतं. तिथं त्यानं उत्तम काम केल्यानं त्याला अधिक प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आलं आणि कंबोडियाच्या मदतीसाठी पाठवण्यात आलं. आपल्या उत्कृष्ट कार्यामुळेच गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याला प्रतिष्ठित अशा ‘रोडेन्ट अवॉर्ड’नं सन्मानित करण्यात आलं होतं. याशिवायही अनेक पुरस्कार त्याला मिळाले. जनावरांच्या शौर्यासाठी ब्रिटिश धर्मादाय संस्थेचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही मसावाला देण्यात आला आहे. हा मान आतापर्यंत केवळ कुत्र्यांसाठी राखीव होता. कंबोडियाचे नागरिक आणि सरकार या उंदराप्रति अतिशय कृतज्ञ आहेत.
जिथे उकरेल, तिथे स्फोटकं! मगावाचे ट्रेनर सांगतात, ठरवून दिलेल्या क्षेत्रात तो फिरायचा. त्याच्यासोबत स्वयंसेवक असायचा. जिथे स्फोटकांचा संशय येईल, त्याठिकाणी मगावा थांबायचा. आपल्या पायांनी तिथली थोडी जमीन उकरायचा आणि तिथून बाजूला सरकारचा. त्याठिकाणी हमखासपणे स्फोटकं सापडायची, असा सुरक्षारक्षकांचा दावा आहे. तो निवृत्त झाल्यानंतर त्याची आम्हाला खूप आठवण येईल, असंही या सुरक्षारक्षकांचं आणि त्याच्या ट्रेनरचं म्हणणं आहे. आपल्या कार्यानं सर्वांच्याच मनात त्यानं आदराचं स्थान मिळवलं आहे.