पुतीन यांच्याविरुद्ध अटकेचं वॉरंट; रशियाने कोर्टालाच स्पष्ट शब्दात सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 08:37 AM2023-03-18T08:37:54+5:302023-03-18T08:50:09+5:30
युक्रेन प्रकरणी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणजेच आयसीसीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मोठा झटका दिला आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया-युक्रेन युद्धावेळी घेतलेल्या भूमिकेचं नोबेल पुरस्कार समितीकडून कौतुक होत असताना आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांविरुद्ध आंतरराष्ट्रीयने न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय पातळीवर या आदेशाची चर्चा रंगली आहे. मात्र, रशियाने या निर्देशाबद्दल आता स्पष्टपणे भूमिका जाहीर केली आहे. तर, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकी यांचे या आदेशाचे स्वागत करत ही तर सुरुवात आहे, अशा शब्दात आपली भूमिका मांडली. मात्र, रशियाने आपल्याला हा निर्णय अमान्य असल्याचे म्हटले आहे.
युक्रेन प्रकरणी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणजेच आयसीसीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मोठा झटका दिला आहे. आयसीसीने व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. दरम्यान, या प्रकरणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, "व्लादिमीर पुतिनविरुद्ध आयसीसीचे वॉरंट ही 'केवळ सुरुवात' आहे." तसेच, व्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचा आयसीसीचा निर्णय हा रशियाच्या आक्रमणाबाबत न्याय पुनर्संचयित करण्याच्या दिशेने केवळ एक प्राथमिक पाऊल असल्याचेही झेलेन्स्की यांनी शुक्रवारी सांगितले. तर, आपणास आयसीसीचा निर्णयच लागू होत नसल्याचे रशियाने म्हटले आहे.
'रशिया इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा सदस्य नाही. त्यामुळे कायदेशीररित्या कोर्टाचा निर्णय आम्हाला लागू होत नाही. आम्ही कोर्टाला कोणतेही सहकार्य करणार नाही. हा निर्णय अवैध असून आम्हाला अमान्य आहे', अशा शब्दात रशिया परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी भूमिका स्पष्ट केली.
Russia is not a member of Rome Statute of ICC & bears no obligations under it. Russia doesn't cooperate with this body & possible warrants for arrest coming from the International Court of Justice will be legally null and void for us: Russian Foreign Ministry Spox Maria Zakharova https://t.co/oYNeQeFroNpic.twitter.com/pFcIqI6oEo
— ANI (@ANI) March 18, 2023
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले तेव्हा हे युद्ध काही दिवसांतच संपुष्टात येईल, असे सर्वांनाच वाटले. व्लादिमीर पुतिन यांचे सैन्य युक्रेनमध्ये पोहोचले, तेव्हा युक्रेन लवकरच रशियापुढे गुडघे टेकणार असल्याचा अंदाज सर्वांनीच बांधला होता. मात्र, अद्याप तसे होताना दिसत नाही. याउलट युक्रेन ठामपणे आघाडीवर आहे. अशा स्थितीत आता रशिया आणि पुतिन यांच्या एक्शनबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या निर्णयामुळे अनेक तज्ज्ञ रशियाचे विघटन आणि पुतिन यांच्या पतनाची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
पुतीन यांना राष्ट्राध्यक्ष पदावरुन हटवले जाऊ शकतात
रशियाचे माजी मुत्सद्दी बोरिस बोंडारेव्ह यांनी म्हटले आहे की, जर पुतिन हे युद्ध स्वतःच्या अटींवर जिंकण्यात यशस्वी झाले नाहीत तर त्यांना पायउतार होण्यास भाग पाडले जाऊ शकते. गेल्या वर्षी रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर बोंडारेव्ह यांनी जाहीरपणे राजीनामा दिला होता. ते जिनिव्हा येथील रशियाच्या राजनैतिक मिशनमध्ये आर्म्स कंट्रोल एक्सपर्ट म्हणून काम करत होते. पुतिन हे सुपरहिरो नाहीत. त्याच्याकडे कोणतीही महासत्ता नाही. ते एक साधे हुकूमशहा आहेत, त्यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून हटवले जाऊ शकते, असे ते म्हणाले.